लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: वेगवेगळे कारखाने, व्यावसायिक आस्थापने, शिपयार्ड, खाणींवरील तसेच बंदर कामगार मिळून ४ हजार कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काल, सोमवारी कामगार दिनी शहरात रॅली काढली. यावेळी कामगारविरोधी सरकारच्या धोरणाचा निषेध करत आपल्या विविध मागण्यांबाबत कामगारांनी घोषणा दिल्या.
येथील कदंब बसस्थानकाकडून निघालेली रॅली शहरात फिरून आझाद मैदानावर आली व तेथे जाहीर सभेत रूपांतर झाले. महिला कामगारांनीही या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित लावली. आझाद मैदानावरील जाहीर सभेत आयटकचे प्रदेश सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका, अॅड. सुहास नाईक व प्रसन्न उटगी यांची भाषणे झाली.
किमान वेतनात वाढ करण्याच्या मागणीबरोबरच अन्य मागण्यांचा ठराव संमत करण्यात आला. अकुशल कामगारांना दिवशी ७५० रुपये, निमकुशल कामगारांना दिवशी ८२५ रुपये, कुशल कामगारांना दिवशी ९१० रुपये व अति कुशल कामगारांना दिवशी १,००० रुपये किमान वेतन दिले जावे, अशी मागणी करण्यात आली.
खाण व्यवसाय त्वरित सुरू करा, बांधकाम खात्यात पीडब्ल्यूडी लेबर सप्लाय सोसायटीअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना सेवेत नियमित करा, त्यांना सातवा वेतन आयोग लागू करा, पूर्व प्राथमिक हेल्परना किमान दहा हजार रुपये वेतन द्या, वीज खात्यातील ३८० लाइन हेल्पर्सना सेवेत कायम करा, अंगणवाडी सेविकांचे वेतन वाढवा, वेर्णा येथील फार्म उद्योगांतील काही जणांचे केलेले निलंबन, सेवा बडतर्फी तसेच बदल्या मागे घ्या, संजीवनी सहकारी साखर कारखान्यातील ३२ कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करा, कॅसिनोंवरील कर्मचाऱ्यांची पिळवणूक थांबवा, आदी मागण्या करण्यात आल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"