वास्को: दोन महिने अमेरिकेत उपचार घेतल्यानंतर गोव्याचे माजी नगरविकासमंत्री तथा म्हापसाचे आमदार अॅड. फ्रान्सिस डिसोझा बुधवारी गोव्यात परतले.
२० आॅगस्ट रोजी फ्रान्सिस डिसोझा उपचारासाठी अमेरिकेला गेले होते. अमेरिकेत त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले होते. आपल्याला विश्वासात न घेता मंत्रिमंडळातून वगळल्याने फ्रान्सिस डिसोझा यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. आज संध्याकाळी ६.३० वाजता फ्रान्सिस डिसोझा दाबोळी विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांना उपस्थित पत्रकारांनी मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
२० तासांच्या प्रवासानंतर मी गोव्यात पोहोचलो आहे. संपूर्ण हालचालींची माहिती घेतल्यानंतरच आपली पुढची पावले काय असणार याबाबत येत्या दोन दिवसांत सांगणार असल्याचे फ्रान्सिस डिसोझा यांनी पत्रकारांना सांगितले. यानंतर ते येथून त्यांच्या निवास्थानावर जाण्यासाठी रवाना झाले.