म्हापसा : सत्ता टिकावी म्हणून पक्षाच्या ध्येय धोरणांना तिलांजली देवून नीतीमत्ता सोडून दुस-या पक्षातील आमदार आयात करण्याच्या प्रकाराचे दुरोगामी परिणाम पक्षाला भोगावे लागतील असा गंभीर इशारा भाजपा जेष्ठ नेते माजी मंत्री अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांनी दिला आहे. सध्या अमेरिकेत उपचार घेत असलेल्या डिसोझा यांच्यावरील उपचार अंतिम टप्प्यात आला असून पुढील काही दिवसात ते गोव्यात परतण्याची शक्यता आहे. काही दिवसापूर्वी राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करुन डिसोझा यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता. त्यावेळी सुद्धा त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. आता काँग्रेसच्या दोन आमदारांना पक्षात प्रवेश दिल्या बद्दल त्यांनी पुन्हा एकदा नाराजीचा सूर काढला आहे.
पक्षात तसेच पक्षाच्या गाभा समितीत अनेक जेष्ठ नेते आहेत. या नेत्यांना विश्वासात न घेतात मोचक्याच चार पाच नेत्यांकडून पक्षासंबंधीचे निर्णय घेतले जातात. त्यांच्याकडूनच पक्षाचा कारभार चालवला जातो असे डिसोजा म्हणाले. त्यांनी घेतलेल्या निर्णयावर केंद्रीय नेतृत्वाकडून फक्त मोहर लावली जात असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
काँग्रेस पक्षातून दोन आमदार आयात करणे हे काही नवीन गोष्ट नाही. दीड वर्षापूर्वी असाच निर्णय घेवून निवडणुकापूर्वी दोघांना पक्षात प्रवेश दिला होता. त्यानंतर आणखीन एक व आता दोन अशा पाच काँग्रेसजनांना प्रवेश देण्यात आला. या पुढे आणखी किती काँग्रेसजनांना प्रवेश देणार असा प्रश्न करुन यावरुन काँग्रेसशिवाय भाजपची गाडी चालू शकत नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. सध्या घडत असलेल्या घडामोडी बद्दल आपल्याला नाविन्य वाटत नसल्याचे डिसोझा म्हणाले. होत असलेल्या प्रकारांचा भाजपाला तोटा होवून मित्र पक्षांना त्यांचा लाभ होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे पक्षाचे जेष्ठ नेते. दोनवेळचे प्रदेशाध्यक्ष. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने राज्यात पहिल्यांदा पूर्णबहुमत प्राप्त केले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर संरक्षण मंत्री झाल्यानंतर पार्सेकर राज्याचे मुख्यमंत्री झाले पण विद्यमान परिस्थितीत अशा जेष्ठ अनुभवी नेत्याला पद्धतशीरपणे बाजूला सारुन योग्य नसून किमान त्यांचा सल्ला घेणे गरजेचे होते असेही डिसोजा म्हणाले. या पार्श्वभूमीवर पक्षाची विद्यमान परिस्थिती पाहता पक्ष चुकीच्या मार्गाने जात असून चुकलेला मार्ग पुन्हा सापडणे कठीण असल्याचे डिसोझा म्हणाले.