म्हापसा : काशीराम म्हांबरे
पैसे दुपट्ट होणाऱ्या योजनेत रक्कम गुंतवण्यास सांगून अस्नोडा येथील एका व्यक्तीला ५८.५० लाखांचा गंडा घातल्या प्रकरणी कोलवाळ पोलिसांकडून संशयित विजय विनायक रेडकर तसेच रिया आचार्य यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.
निरीक्षक विजय राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार या संबंधी सुकडो नास्नोडकर ( मधलावाडा अस्नोडा ) यांनी लेखी तक्रार दाखल केली होती. केलेल्या तक्रारीत २०१६ पासून ते १७ आॅक्टोबर २०२३ पर्यंत संशयितांनी आपली फसवणुक केल्याचे म्हटले आहे. दोन्ही संशयितांनी तक्रारदाराला एका विशिष्ठ योजने अंतर्गत गुंतवणुक करुन रक्कम होणार असल्याचे आमीष दाखवून गुंतवणुकीस तक्रारदाराला प्रवृत्त केले.
मात्र गुंतवणुक केल्यानंतर रक्कमेची परतफेड करण्यास अपयश आल्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारदाराने या संबंधी जाप विचारला असता त्याला जिवंत मारण्याची धमकी देण्यात आली होती. कोलवाळ पोलिसांनी या संबंधी कलम भादंसं च्या कलम ४२० तसेच ५०६ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास कार्य सुरु करण्यात आले आहे.