पणजी - विनाशुल्क शववाहिनीची सेवा सुरू करण्याच्या शासकीय आरोग्य विभागाच्या हालचालींना विरोध दर्शविणारे जे निवेदन काँग्रेसचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी केले ते खेदजनक, निषेधार्ह आणि गरीबविरोधी आहे, असे गोवा शिवसेनेने म्हटले आहे. उपाध्यक्ष राखी प्रभुदेसाई नाईक यांनी आमदार सिल्वेरा यांचा निषेध करताना म्हटले आहे, की बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विनाशुल्क शववाहिनीसेवा सुरू करण्याच्या सरकारी कृतीविरुद्ध अनावश्यक आंदोलन करून सिल्वेरा मतांचे राजकारण करीत आहेत.
मृताच्या नातलगांना मृतदेह घरी नेण्यासाठी सध्या बराच पैसा खर्च करावा लागत असल्याने ही विनाशुल्कसेवा त्यांना अत्यंत सहाय्यभूत ठरणार आहे, असे नमूद करून नाईक यांनी म्हटले आहे, की गोवा राज्य आणि त्यात राहणाऱ्या गरीब लोकांच्या हिताविरुद्ध कारवाया करणे सिल्वेरा यांच्यासारख्या राजकारण्यांनी आता थांबवावे. गोव्याच्या जनतेचे राहणीमान उंचावण्यासाठी ते काही करू शकत नसतील तर निदान आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना दिलासा देणाऱ्या योजनांमधे खोडा घालण्याचे तरी त्यांनी थांबविले पाहिजे.
या ‘रुग्णवाहिका माफिया’विरुद्ध शिवसेनेकडे असंख्य तक्रारी आलेल्या आहेत; त्यामुळे त्याला यापासून दूर करण्याची तातडीची निकड आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी याच्या समर्थनार्थ उचललेल्या पावलाबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो; परंतु त्याचवेळी आमची शासनाला विनंती आहे, की विनाशुल्क शववाहिनीसेवेत केवळ गोवेकरांनाच रोजगार दिला जावा. गोव्याबाहेरील कोणाला रोजगार दिला गेल्यास आम्ही ते खपवून घेणार नाही. ‘माहितीचा अधिकार’ आणि इतर मार्गांनी शिवसेना या शववाहिनींवर देखरेख ठेवेल, असेही नाईक यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे.