लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सभापती रमेश तवडकर यांच्या श्रमधामची गाथा आता दिल्लीपर्यंत पोहोचली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांनी या मोहिमेची माहिती दिली. 'श्रमधाम को मेरा पुरा सहयोग रहेगा', अशा शब्दात पंतप्रधानांनी आपल्याला आश्वस्त केल्याचे तवडकर यांनी म्हटले आहे.
श्रमधाम योजनेत संरक्षक सदस्य बनण्याची विनंती पंतप्रधानांना केली आहे. तसेच त्यांना डिसेंबर महिन्यात पैंगीण येथे होणाऱ्या २४ व्या लोकोत्सवात भाग घेण्याचे निमंत्रणही देण्यात आले आहे, असेही तवडकर यांनी सांगितले. यावर आपला कार्यक्रम पाहून कळविण्यात येईल, असे पंतप्रधान यांनी आपल्याला सांगितल्याचेही ते म्हणाले.
विधानसभेच्या पीएसी हॉलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत तवडकर म्हणाले की, आपण पत्नी सरपंच सविता तवडकर, बलराम संस्थेचे खजिनदार गणेश गावकर हे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह पंतप्रधान मोदी यांना भेटलो. या भेटीत त्यांना आदर्श युवा संघाच्या लोकोत्सवाची, बलराम शैक्षणिक संस्थेची, आदिवासी चळवळीची आणि श्रमधाम योजनेची माहिती दिली. पंतप्रधान आमच्या योजनांवर प्रभावित झाल्याचेही तवडकर यांनी सांगितले. यावेळी त्यांच्याबरोबर दिवाकर वेळीप, विशाल देसाई, विनय तुबकी आणि संजीव तिळवे उपस्थित होते.
दिल्ली भेटीवरून तर्कवितर्क काढू नका
आपल्या प्रत्येक दिल्ली भेटीनंतर तर्कवितर्क लावून बातम्या प्रसिद्ध होत असल्या तरी आपली दिल्ली भेट ही केवळ आपल्या विविध प्रकल्पांशी संबंधित आहे. ती कधीच मंत्रिमंडळाशी किंवा मंत्रिपदाशी संबंधित नसते आणि यापुढेही असणार नाही, असे तवडकर यांनी सांगितले.