पणजी - बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात उपचार घेणारे केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या स्थितीत गुरुवारी आणखी सुधारणा झाली, अशी माहिती गोमेकॉ इस्पितळाचे डीन डॉ शिवानंद बांदेकर यांनी दिली.बुधवारच्या तुलनेत गुरुवारी नाईक यांची स्थिती अधिक चांगली आहे. त्यांना खाटेवर बसवून पाणीही पिण्यास दिले गेले. त्यांच्या खांद्यावरील बँडेज गुरुवारी बदलली गेली. त्यांच्या सर्व जखमाही बऱ्या होत आहेत, असे बांदेकर यांनी मिडिया बुलेटीनमध्ये नमूद केले आहे.त्यांना सौम्य अशी फिजिओथेरपी गुरुवारी दिली गेली. श्रीपाद नाईक यांना पूर्वी रक्तदाबाचा त्रास होता. अपघात झाला तेव्हा त्यांचा रक्तदाब वाढला होता. मात्र आता त्यांचा रक्तदाब नॉर्मल आहे. त्यांचा ऑक्सीजन सेच्युरेशन स्तर ९८ टक्के आहे. तथापि, त्यांना हाय फ्लो नेसल केनुला ऑक्सिजनवर ठेवले गेले आहे. डिन बांदेकर यांच्या मते नाईक यांच्यावर सातत्याने गोमेकॉच्या डॉक्टर पथकाचे लक्ष आहे.पत्नीच्या मृत्यूची कल्पनाश्रीपाद नाईक यांना त्यांची पत्नी विजया यांचा मृत्यू झाला असल्याचे अगोदर सांगितले गेले नव्हते. बुधवारी रात्री त्यांना त्याची कल्पना दिली गेली. मुलाकडूनच त्यांना माहिती दिली गेली. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी खरी माहिती नाईक यांना देणे गरजेचे होते. त्यानुसार माहिती दिली गेली. पत्नीच्या निधनाचे वृत्त सांगितले गेल्यानंतर श्रीपाद नाईक यांचा रक्तदाब तेव्हा किंचित हलला होता. मात्र आता ती समस्या नाही. गुरुवारी त्यांच्या रक्ताच्या व लघवीच्याही काही चाचण्या केल्या गेल्या. त्यांचे अहवालही नॉर्मल आले.
श्रीपाद नाईक यांच्या स्थितीत आणखी सुधारणा, डीनकडून माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 7:32 PM