- वासुदेव पागी
पणजी : खाकी वेशातील पोस्टमन सायकलवरून येऊन पत्रे देऊन जाताना पाहिले आहे. आता सायकल गेली आणि स्कुटर आली. स्कूटरसाठी पेट्रोल भत्ता तेवढा पोस्टमनला दिला जातो. यापुढे मोठ्या शहरात चारचाकी वाहन देण्याचाही पोस्ट खात्याचा विचार आहे. अर्थात ही गाडी तीन किंवा चार पोस्टमनसाठी एक असेल.
देशातील मोठ्या शहरात ज्या ठिकाणी पत्र व्यवहार अधिक असतात आणि लोकवस्तीही मोठ्या प्रमाणावर असते त्या ठिकाणी पत्रे वितरीत करण्यासाठी भविष्यात पोस्टमन कार घेऊन गेलेले दिसले तर आश्चर्य वाटण्यासारखे नसणार. कारण या प्रस्तावावर टपाल खाते गांभिर्याने विचार करीत आहे. गोव्याचे पोस्टमास्टर जनरल विनोद कुमार यांनी लोकमतशी बोलताना याची माहिती दिली. अर्थात तीन किंवा चार पोस्टमनसाठी ही गाडी असेल असे ते म्हणाले.
पत्रातून आता कौटुंबिक किंवा मित्रांच्या संवादाची भाषा जात नाही. म्हणून काही टपाल खात्याचा कामाचा भार हलका झालेला नाही आणि टपाल खात्याची कामेही कमी झालेली नाहीत. उलट नोटिसा, नोकरीसाठी पत्रे, सरकारी आदेश व इतर स्वरूपाची पत्रे खूप वाढली आहेत. ऑनलाईन शॉपिंग सारख्या व्यवहारातही उत्पादने पुरविण्याचे काम अॅमेझॉन सारख्या मोठ्या एजन्सी टपालखात्याला मोठ्या प्रमाणात देतात. शिवाय टपाल खात्याने कामाचा विस्तारही वाढविला असल्याचे त्यांनी सांगितले.
केवळ टपालापुरते मर्यादीत न राहता बँकींग, विमा या सारखे व्यवहार टपाल खाते करीत आहे व त्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. केवळ गोव्या सारख्या लहान राज्यातही ४ लाखांहून अधिक खाती असल्याची माहिती त्यांनी दिली. गोव्यात टपाल खात्याचे १० टक्के संगणकीकरण करण्यात आले आहे. तसेच नेटवर्कतर्फे सर्व टपाल कचेऱ्या जोडण्यात आल्या आहेत. राज्यात १०४ मुख्य टपाल कचेऱ्या १५३ शाखा कचेऱ्या मिळून २५७ टपाल कचेऱ्या आहेत. राज्यात ५०० हून अधिक टपाल खात्याचे कर्मचारी तर ४०० हून अधिक ग्राम डाक सेवक आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.