पणजी : गोवा सुरक्षा मंच गोव्यात तग धरू शकेल काय, पणजीत तरी हा पक्ष रुजू शकेल काय आणि सुभाष वेलिंगकर यांची पुढील कारकीर्द आशा व अपेक्षांची राहू शकेल काय या सगळ्य़ा प्रश्नांची उत्तरे पोटनिवडणुकीच्या निकालाद्वारे मिळणार आहे. सुरक्षा मंचला पणजीत यापूर्वीच्या दोन निवडणुकांमध्ये अतिशय नगण्य अशी मते मिळाली. केवळ दीड टक्के मते प्राप्त करणारा सुरक्षा मंच हा पणजीत उभा राहू शकत नाही असे अनेकांना त्यावेळी वाटले. सुरक्षा मंचचे सर्वेसर्वा प्रा. सुभाष वेलिंगकर हे रिंगणात उतरल्यामुळे मात्र यावेळी सुरक्षा मंचची चांगली हवा पणजीत तयार झाली. वेलिंगकर यांच्या अनेक कोपरा बैठका झाल्या. अनेक गाठीभेटी झाल्या.ख्रिस्ती मतदारांशीही त्यांनी स्वतंत्रपणो संवाद साधला. या शिवाय रोज वेलिंगकर यांचा प्रचार करणारे वाहन पणजीत दिवसभर फिरत होते. वेलिंगकर यांचे भाषण असलेली ध्वनीफीत लावली जात होती. यामुळे वातावरणनिर्मिती झाली पण वेलिंगकर यांच्या प्रचारासाठी पणजीतील अतिशय स्थानिक म्हणता येतील असे कार्यकर्ते नव्हते. भाजपने हाच प्रमुख मुद्दा बनवला. वेलिंगकर यांच्याकडे पणजीतील कार्यकर्तेच नाहीत, त्यांनी बाहेरचेच कार्यकर्ते आणले आहेत असा प्रचार केला गेला. भाजपनेही बाहेरचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते आणले होते पण त्यांची संख्या कमी होती. भाजपकडे जास्त स्थानिक कार्यकर्तेच होते. वेलिंगकर यांना पणजीतील बहुजन समाजाने किती मते दिलेली असतील याचा अंदाज कुणालाही येत नाही. भाजपच्या कोअर टीमच्या अनेक सदस्यांना मात्र वाटते की, वेलिंगकर हे एक हजारपेक्षा जास्त मते मिळवू शकणार नाहीत. मात्र वेलिंगकर यांच्या समर्थकांना वाटते की, वेलिंगकर दोन हजार मते प्राप्त करतील. काँग्रेसच्या काही नेत्यांना वेलिंगकर बाराशे ते दीड हजार एवढीच मते मिळवतील असे वाटते.समजा वेलिंगकर यांना एक हजारही मते मिळविता आली नाही तर पणजीत गोवा सुरक्षा मंचला भवितव्य नाही असा त्याचा अर्थ होईल, असा निष्कर्ष काही मतदारांकडून काढला जात आहे. वेलिंगकर यांनी केलेल्या प्रचाराचे कौतुक सगळीकडेच आहे. वेलिंगकर यांच्यावर व्यक्तीगत व कौटुंबिक स्तरावर विरोधकांनी केलेले आरोप अनेक पणजीवासियांना आवडले नाहीत. मात्र तरीही हे मतदार वेलिंगकर यांनाच मत देतील असे मुळीच म्हणता येत नाही. काहीजण नोटाला, काहीजण भाजपला तर काहीजण आम आदमी पक्षाला मते देतील अशी चर्चा आहे. गोवा सुरक्षा मंचला लांबचा पल्ला गाठावा लागेल, अजून खूप कष्ट घ्यावे लागतील असे पणजीतील काही उच्च शिक्षित मतदारांचे म्हणणो आहे. वेलिंगकर हे 70 वर्षे वयाचे आहेत. यापुढील काळात त्यांचा जोष कमी होईल व त्यामुळे गोवा सुरक्षा मंचचे बळही कमी होऊ लागेल असे भाजपमधील काही चाणक्यांना वाटते. वेलिंगकर वगळता गोवा सुरक्षा मंचला दुसरा एकही प्रभावी चेहरा अजून लाभलेला नाही ही त्या पक्षाची मर्यादा आहे, असेही भाजपमध्ये मानले जाते. पणजीतील काही अतिशय सज्जन मतदार हे वेलिंगकर यांना मते देतीलच पण सिद्धार्थ कुंकळ्य़ेकर यांचा ज्यांना राग होता व आहे अशा काहीजणांनी बाबूशला मते देणो पसंत केल्याची चर्चा सारस्वत समाजातीलही काही मतदारांमध्ये आहे. आपचे भवितव्य काय? दरम्यान, आम आदमी पक्षाने ज्यावेळी पावणो दोन हजार मते प्राप्त केली होती, तेव्हा पणजीत आपची स्थिती वेगळी होती व आता वेगळी आहे. यावेळच्या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाने फार प्रभावी किंवा खूप जोरात प्रचार केला असे दिसले नाही. वाल्मिकी नायक यांच्याविषयी पणजीतील अनेक मतदारांना आदर आहे पण त्यांनी यावेळी वेगळा विचार केला. जो उमेदवार जिंकून येईल असे वाटते, त्या उमेदवाराला मत देण्याची भूमिका कांपाल, मिरामार, आल्तिनो, देऊळवाडा व अन्य परिसरातील लोकांनी घेतलेली असावी असे म्हणण्यास वाव आहे. स्मार्ट सिटीच्या कामांशीनिगडीत व्यवहारांच्या विषयावरून काँग्रेसने आणि गोवा सुरक्षा मंचने सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांना हैराण केले. काँग्रेसने रोज नवनवी माहिती उजेडात आणली. सुरक्षा मंचनेही या विषयावरून सनसनाटी निर्माण केली पण आम आदमी पक्ष तशी स्थिती निर्माण करू शकला नाही. आपची मोठी जाहीर सभा किंवा आपची प्रभावी अशी कोपरा सभा किंवा रॅली वगैरे पणजीत कुणाला दिसली नाही. आपच्या प्रचाराची धार कमी झाली. परिणामी वाल्मिकी नायक यांची मते यावेळी घटलेली असेल की वाढलेली असेल याचा अंदाज मतदारांना आलेला आहे. गोव्यात व विशेषत: पणजीत आपचे भवितव्य काय याचे उत्तर येत्या 23 रोजी निवडणूक निकालातून मिळेल.
सुरक्षा मंचचे भवितव्य निकालावर ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 8:16 PM