काशिराम म्हांबरे ,म्हापसा: वशिल्याचा वापर करून नोकरी देण्याचा प्रकार बंद करण्यात आला आहे. वशिलेबाजीचा प्रकार आता चालणार नसून नोकर भरतीच्या स्पर्धेतून पुढे येणाऱ्याला भविष्यात गुणवत्तेवर आधारीत सरकारी दिली जाणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
म्हापसा येथील ज्ञानप्रसारक मंडळ तसेच संशोधन केंद्रात राष्ट्रीय युवा दिन निमीत्त मुख्यमंत्र्यांच्या प्रगट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनुभव तसेच अप्रेंटिशीप आवश्यक आहे. त्यामुळे उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरीत रुजू होऊन तेथून मिळणाºया अनुभवावर सरकारी नोकरी दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सरकार नोकर भरती करताना कर्मचारी भरती प्रक्रिया लोकसेवा आयोग ( ग्रेड १) किंवा गोवा कर्मचारी भरती आयोगाच्या ( ग्रेड २ तसेच ३) वतिने केली जाणार आहे. भरतीसाठी लागणारी प्रक्रिया पदवीच्या किंवा इतर तत्सम अभ्यासक्रमात प्रवेश करताना आरंभ करावी. त्यासाठी सर्व कॉलेजांना सामान्य ज्ञान तसेच विषयाचे ज्ञान विद्यार्थ्याना उपलब्ध करुन देण्याची सुचना केली जाणार असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.
खाजगी क्षेत्रात नोकरीसाठी भरती प्रक्रिया केली जाते. त्यासाठी सरकारने विविध कंपनीसोबत करार केला आहे. नोकरी भरती मेळावे आयोजित केले जातात. एखाद्याची निवड नोकर भरती मेळाव्यातून झाल्यास भविष्यात त्याला पुढे जाण्याच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात असेही यावेळी सांगितले. शिक्षणा सोबत नोकरी करणाºया विद्यार्थ्याला हजेरीत सवलत देण्याचा विचार केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.