पणजी : G-20 राष्ट्रांच्या आरोग्य कार्यगटाची दुसरी बैठक उद्या, सोमवारपासून येथे सुरू होत आहे. जी व्टेंटी राष्ट्रांसह १० आमंत्रित देश आणि २२ आंतरराष्ट्रीय संघटनांचे मिळून २०० हून अधिक प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. १९ एप्रिलपर्यंत तीन दिवस ही बैठक चालणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया अध्यक्षस्थानी असतील. विदेशातील दोन मंत्रीही बैठकीत सहभागी होणार असून जी व्टेंटीचे सदस्य असलेल्या वेगवेगळ्या राष्ट्रांचे २०० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
बैठकीत जी -२० हेल्थ ट्रॅक अंतर्गत निवडलेल्या तीन प्राधान्यक्रमांवर विस्तृत चर्चा होईल. यामध्ये आरोग्यविषयक आपत्कालीन स्थितीला प्रतिबंध, सज्जता आणि प्रतिसाद यावर चर्चा केली जाईल. सुरक्षित, प्रभावी, दर्जेदार आणि किफायतशीर वैद्यकीय प्रतिकार यांची सुगम्यता आणि उपलब्धतेवर लक्ष केंद्रित करून औषध निर्मिती क्षेत्रातील सहकार्य मजबूत करणे आणि डिजिटल आरोग्य नवोन्मेष आणि उपाय सार्वत्रिक आरोग्य व्याप्ती आणि आरोग्य सेवा वितरण सुधारण्यास मदत करणे यास प्राधान्य असेल.
जी २०-हेल्थ ट्रॅकमध्ये आरोग्य कृतिगटाच्या चार बैठका आणि एक आरोग्य मंत्रिस्तरीय बैठकीचा समावेश असेल. कृतिगटाच्या बैठकीच्या निमित्ताने चार अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. १८ - १९ एप्रिल रोजी होणाऱ्या कृतिगटाच्या दुसऱ्या बैठकीच्या निमित्ताने डिजिटल आरोग्यावर एक विशेष कार्यक्रमदेखील आयोजित केला आहे. देशभरात विविध ठिकाणी या बैठका आयोजित केल्या जातील.
दरम्यान, समृद्ध विविधता आणि संस्कृतीचे दर्शन घडवण्याच्या उद्देशाने गोव्याच्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिनिधी गोव्याच्या निसर्गसौंदर्याचा तसेच आदरातिथ्याचा आनंद घेण्यासोबतच तेथील खाद्यसंस्कृतीचा देखील अनुभव घेऊ शकतील.