- सुनीता फडणीस, पर्वरी
महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशातील असंख्य तर भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेले शेगावचे संत श्री गजानन महाराज, यांचा प्रगटदिन माघ वद्य सप्तमीला सर्वत्र अतिशय उत्साहाने साजरा होतो. या दिवशी त्यांचे आवडते पदार्थ चून (पिठले), भाकरी, अंबाडीची भाजी, झुणका, कांदा, हिरव्या मिरच्या असा नैवेद्य भक्तजन मोठ्या भक्तिभावाने अर्पण करतात. आपल्या गोमंतकातही यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे. शके १८०० मध्ये माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ रोजी महाराज प्रकट झाले होते.
"अन्नं ब्रहोति" या उपनिषदातील उक्तीचा बोध करण्याकरीताच जणू महाराजांनी लीला केली. देविदास पातुरकरांच्या घराबाहेर पडलेल्या पत्रावळीतील अन्नकण ते वेचत होते. सर्वप्रथम बंकटलाल अगरवाल यांनी त्यांना पाहिले आणि हे कोणीतरी असामान्य योगी आहेत हे जाणले. श्री दासगणू गजानन महाराजांचे वर्णन करताना लिहितात.
"तो सतेज कांती मनोहर | दंड गर्दन पिळदार | भव्य छाती दृष्टी स्थिर । भृकुटी ठायी झाली असे ||" अशी ही आजानूबाहू मूर्ती पाहताच बंकटलाल आनंदाने त्यांच्या चरणी लीन होण्यासाठी म्हणून पुढे आले, तेव्हा महाराज त्या स्थानावरून निघून गेले. त्यांना कमलपत्रासमान अलिप्त राहाणे आवडत असे.
संत श्री दासगणू महाराज विरचित "श्री गजानन विजय ग्रंथ" हे गजानन महाराजांचे ओवीबद्ध चरित्र अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. भक्तगण या ग्रंथाचे नित्यनेमाने पारायण, वाचन करतात. या ग्रंथांतील ओव्यामध्ये गजानन महाराजांची महती, आध्यात्मिक तत्त्वज्ञान, जीवनाचे सार ओतप्रोत भरलेले आहे. काही ओव्या खूप विचार करायला भाग पाडतात. आणि जीवनाचे रहस्य जणू अलगद उलगडून टाकतात. मला अतिशय आवडणाऱ्या ओव्यांमधली एक ओवी "कोठोनी आलो आपण । याचे करा हो चिंतन " आपल्याला जीवनाचे तत्त्वज्ञान विशद करते.
"गण गण गणात बोते" हे भजन महाराज निरंतर करीत असत. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांतच खऱ्या अर्थाने महाराजांच्या या सिद्धमंत्रात व्यक्त झाला आहे. त्यावरूनच त्यांना "गजानन" हे नामाभिधान प्राप्त झाले. कारण इतिहासदृष्ट्या त्यांचा जन्म-नाव-गाव याचा काहीच पुरावा लाभलेला नाही. संत दासगणू श्री गजानन विजय ग्रंथात लिहितात.
"जो स्वयंमेव ब्रहा झाला। नांवरुप कोठून त्याला? । नामरुपांचा गलबला । प्रकृतीच्या आश्रयास ।।. अशा या साक्षात परब्रम्ह स्वरूप गजानन महाराजांचा प्रभाव हा मानवाप्रमाणेच पशू, पक्षी आणि पंचमहाभूतांवर सुद्धा होता. चरित्र ग्रंथात वर्णिल्याप्रमाणे टाकळीकरांचा द्वाड घोडा महाराजांच्या कृपेने आज्ञेत वागू लागला, सुकलालाची त्रास देणारी गाय महाराजांचे दर्शन होताच सुज्ञ झाली. कावळ्यांनी आज्ञा मानली.
गाय, घोडा, कावळा ह्यासारख्या पशूपक्ष्यांना वश करून चराचरात भगवंत भरून राहिला आहे हे त्यांनी सोदाहरण दाखविले. एवढेच काय तर अकोली गावात शुष्क विहिरीला क्षणात जलमय केले, अग्निवाचून चिलीम पेटवली. अशा अनेक प्रसंगांतून आपल्याला हे दिसून येते, पंचमहाभूतांवर देखील महाराजांची सत्ता चालत होती.
त्यांचा "योगियांचा राणा गजानन" हा केलेला उल्लेख अतिशय योग्य वाटतो. कारण महाराजांचे चालणे वायूच्या गतीने होते. क्षणात ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचत. महाराजांचे ज्ञान अगाध होते. ते अस्खलित वेद म्हणत, कधी दंग होऊन "चंदन चावल बेल की पतिया" हे त्यांचे आवडते भजन विविध रागांतून गात तेव्हा ऐकणाराही तल्लीन होत असे.
"हा पिसा कशाचा? महाज्ञानी। चारी वेद याच्या वदनीं । नांदतात प्रत्यक्ष ॥..... परमहंस दीक्षा याची । वार्ता न उरली बंधनाची । कोणत्याही प्रकारची । हा जीवनमुक्त सिद्धयोगी " हे त्यांचे वर्णन म्हणजे सार्थ शब्दांकन आहे, हे पटते. भूत, भविष्य आणि वर्तमान जाणणाऱ्या, त्रिकालज्ञ असलेल्या महाराजांची सत्ता अगाध होती. गजानन महाराजांनी आपल्या भक्तांना संकटातून तारले. योग सिद्धी प्राप्त असलेल्या महाराजांनी अनेकांचे आजार, व्याधी बऱ्या केल्या. सामान्य जनांच्या भौतिक बुद्धीवादाच्या कक्षेपलीकडील असलेल्या काही गोष्टी चमत्कार म्हणून वाटत असल्या तरीही ते त्यात गुंतून पडले नाहीत, त्यांनी वेळोवेळी भक्तांना बोध केला.
परमहंस हे जाती, धर्म, पंथ या भेदापलीकडील असतात हे सुद्धा त्यांनी काही प्रसंगातून लोक मानसावर बिंबवले. ज्या परमेश्वराने आपल्याला सर्व दिले त्याची भक्ती करा, त्याचा कधीच विसर पडू देऊ नका, हे भक्तांना त्यांचे कळकळीने सांगणे असे. तपश्चर्येच्या अतिशय उन्नत स्तरांवर पोहोचलेले हे महान योगी, यांचे अवतार कार्य संपल्यानंतर सुद्धा यांचा प्रभाव हा अधिकाधिक वाढत गेलेला आपल्याला दिसतो. आजही श्रध्देने शरण आलेल्या भक्तांना प्रचीती आल्याशिवाय राहत नाही. भक्तवत्सल दीनोद्धारक श्रीगजानन महाराजांची कृपा अशीच आम्हां सर्वांवर राहो ही त्यांच्या चरणी प्रार्थना.