पणजी : मोबाईल, कॉम्प्युटर, तसेच आॅनलाईन पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या गेम्स मुलांच्या मानसिकतेला आक्रमक बनवतात. जीटीए, मोटरसायकल राईडिंगसारखे खेळ खेळणाऱ्या मुलांची मानसिकता गुन्हेगारीची बनते. मोबाईलवरील अॅँग्री बडर््स, टॅम्पल रन, कॅण्डीक्रश अशा खेळांमुळे लहान वयात डोळ्यांना चष्मा लागतो. मात्र, मोबाईल हाताळण्याचा अतिरेक झाल्यास कालांतराने दृष्टीवरही परिणाम जाणवू शकतो. द एनर्जी अॅण्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट (टेरी) आणि धेंपो ग्रुप्स्च्याविद्यमाने विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर सिक्युरिटी अॅण्ड सेफ्टी फॉर स्टुडण्ट’ या विषयावर मिनेझिस ब्रागांझा संस्थेत कार्यशाळा झाली. पणजीतील विविध विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. या वेळी धेंपो समूहाचे ज्येष्ठ सरव्यवस्थापक बी.टी. बोके, सायबर सुरक्षातज्ज्ञ रक्षित टंडन, टेरीच्या शबाना काझी आणि सुल्तानत काझी उपस्थित होत्या. रक्षित टंडन यांनी सोशल मीडियाचे धोके आणि सुरक्षा यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच ईमेल, मोबाईल वापराचे धोके यावरही मार्गदर्शन केले. १५ वर्षांखालील मुलांना मोबाईलवर गेम्स खेळू देणे हे त्यांच्या डोळ्यांच्या दृष्टीसाठी घातक असल्याचे टंडन यांनी सांगितले. त्याचप्रमाणे १0 वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये (ते खेळत असलेल्या गेम्सप्रमाणे) मानसिकतेतही बदल होत जातो. मुलांमध्ये प्रसिद्ध असलेली ‘जीटीए’ ही सर्वांत हिंसक गेम असून केवळ १८ वर्षांवरील मुलांनाच हे गेम खेळण्यास पालकांनी संमती द्यावी. मोबाईलवर येणाऱ्या बऱ्याचशा फ्री गेम्स मुले आई-वडिलांच्या मोबाईलवरून डाउनलोड करतात. गेम्स मुलांचा मानसिक विकास आणि डोळ्यांसाठी अपायकारक असतातच शिवाय, गेम्स डाउनलोड करताना मान्य करण्यात येणाऱ्या अटी न वाचताच देण्यात आलेली मान्यता अकाउंट हॅक करू शकते. मुलांना त्यांच्या वयोगटाप्रमाणे मोठ्या स्क्रीनवर म्हणजे कॉम्प्युटरवर २४ तासांत केवळ १५ ते २0 मिनिटांपर्यंत गेम्स खेळायला देणे योग्य आहे. फेसबुक, ई-बँकिंग सेवेचा आॅनलाईन वापर करताना प्रौढांनीही काळजी घेणे आवश्यक असल्याचे टंडन म्हणाले. बेवचे मुख्य पान हे फेक व डुप्लिकेट असू शकते. अशा पेजवर आपल्या बँक अकाउंट नंबरसकट माहिती भरतो आणि ती हॅकर्सच्या हाती लागते. त्यामुळे पासवर्ड हे कठीण असावेत. पासवर्डसाठी फॅमिलीमधील नावे, जन्मतारखा देणे टाळावे, असेही टंडन यांनी सांगितले. वॉटस्अॅप हा मोफत मेसेंजर असल्याने कोणतीही माहिती, फोटो, विडिओ या अॅपवरून शेअर करण्याचे प्रमाण वाढले आहे. वॉटस्अॅपमधील माहिती तत्पूर्वी डिलीट केली तरी काही काळासाठी ही माहिती, फोटो बॅकअपमध्ये राहतात. त्यामुळे वॉटस्अॅपमधून शेअर करण्यात येणारे संदेश हे सुरक्षित आहेत, अशी भावना चुकीची आहे. मुलांना वॉटस्अॅप वापरण्यास सक्त बंदी करावी, असेही टंडन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गेम्स धोकादायक
By admin | Published: July 28, 2015 2:09 AM