ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १५ - गोवामधील भाजपा सरकारने महात्मा गांधी जयंतीला सरकारी सुट्टीतून वगळल्याने वाद निर्माण झाला आहे. गोवा सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या यादीमध्ये २ ऑक्टोबर हा 'कामकाजाचा दिवस' दाखवण्यात आला आहे. काँग्रेसने सत्ताधा-यांच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत म्हणून प्रसिद्ध असणारे गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांच्या सरकारने नुकताच या वर्षाच्या सरकारी सुट्टींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये गांधी जयंतीनिमित्त दिली जाणारी सरकारी सुट्टी रद्द करण्यात आली आहे. गोवामधील शाळावगळता अन्यत्र या दिवशी सुट्टी दिली जाणार नाही असे समजते. गेल्या वर्षीपर्यंत २ ऑक्टोंबरला सुट्टी दिली जात होती. मग यंदा ही सुट्टी का रद्द करण्यात आली असा सवाल काँग्रेसचे स्थानिक नेते दुर्गादास कामत यांनी उपस्थित केला. गोव्यातील विद्यमान सरकारने आता नथुराम गोडसे यांच्या जन्मदिनी सुट्टी द्यायला नको असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. तर एकीकडे ब्रिटनमध्ये महात्मा गांधीजींचा भव्य पुतळ्याचे अनावरण होत असताना गोवा सरकारने असे कृत्य करणे दुर्दैवी असल्याचे काँग्रेस प्रवक्त्यांनी म्हटले आहे.