योगेश मिराशीपणजी : गणरायाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असून सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. तर, गणेश पुजेसाठी लागणारे साहित्य आणि फुलांनी बाजार गजबजला आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला पणजी येथील बाजारपेठेत फुलांच्या खरेदीसाठी भक्तांची झुंबड उडाली होती. बाजारात पुरवठा कमी आणि मागणी अधिक असल्याने फुलांच्या किमतीही दुप्पट पाहायला मिळाल्या. त्यामुळे पणजीत फुलांना बुधवारी ‘फुल्ल’ मार्केट होते.
पूजा व सजावट म्हटली की फुलं आलीच. फुलांशिवाय देवाची पूजा-अर्चना होत नाही. त्यामुळेच बाजारपेठेत फुलांचे दर दुप्पट वाढले असले तरीही ग्राहक बिनधास्तपणे खरेदी करत होते. फुले विक्रेतेही पहाटेपासून व्यस्त होते. तर बऱ्याच जणांनी फुलांची आगाऊ बुकींग केली होती. गणेश चतुर्थीनिमित्त बाप्पाला प्रत्येकदिवशी फुलांची आरस दाखविली जाते. काही गणेश भक्तांनी विक्रेत्यांकडे पूर्वनियोजित फुलांची आगाऊ पद्धतीने आरक्षण करून ठेवले होते, असे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारपेठात स्थानिक व्यापाऱ्यांकडे शेवंती, जाई ही फुले होती. तसेच कोल्हापूर, बेळगाव येथून झेंडू, गुलाबांची आयात केली होती. यावेळी फुलांचा हार पाचशे रुपयांपासून ते पाचहजार रुपयापर्यंत उपलब्ध होता. तर मंडळांच्या गणपतीसाठी लागणारे हार हे दहा हजार ते वीस हजारापर्यंत मिळत आहेत. या हारांची हातोहात खरेदी-विक्री होत होती, त्यामुळे अनेक विक्रेत्यांचे हात हार गुंतविण्यात व्यस्त होते. साधारणपणे विक्रेते १५ ते २० रुपयांची सुटी फुले व्यापारी देतात. पण, आज बाजारात सुट्ट्या फुलांसाठी ग्राहकांना ३०-४० रुपये मोजावे लागत होते. तर काही विक्रेते सुटी फुले देण्यास नकार देत होते. चतुर्थीनिमित्त फुलांना प्रचंड मागणी असून दर दुप्पट झाल्याची माहिती पणजीतील फुल विक्रेता रितेश नाईक यांनी ‘लोकमत’ला दिली.
दरम्यान, सफरचंदचेही दर वाढले आहेत. ते १६० ते २०० रुपये किलोने, केळी (वेलची ४० रु. किलो), तर इतर केळी ७० ते ८० रुपये किलोने मिळत आहेत. विशेष म्हणजे सफरचंद हे माटोळीला बांधतात.
फुलं सध्याचे दर रुपयांमध्ये अन्य दिवसांत (रुपये)गुलाब २० ७ ते १० झेंडू १५० ६०शेवंती ३५० (किलो) २०० (किलो)जाईची माळ ५० ३०