- वासुदेव पागीपणजी - सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याचे सांगून दागिने लुटणारी टोळी तीसवाडीत दाखल झाली आहे. या टोळीतील दोघांना जुने गोवे पोलिसांनी अटक केली आहे. एका महिलेला अशाच पद्धतीने लुटण्याचा त्यांचा डाव त्यांच्या अंगलट आला.
या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी विक्रम भगत या दिल्ली येथील आणि मोहम्मद फिरोझ या बिहारी गृहस्थाला जुने गोवे पोलिसांनी अटक केली आहे. एका महिलेचे १.७० लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन त्यांनी पळ काढला होता.
कुभारवाडा - मेरशी येथील रिवणकर इमारतीमध्ये राहणार्या रतना शिरसांगी यांच्या घरात दुपारच्या वेळेस हे दोघे आले. त्यांनी या महिलेला भांडी साफ करून देतो असे सांगितले. त्यानंतर महिलेने घरातील भांडे साफ करण्यास दिली. त्यानंतर ती साफ केल्यानंतर संशयितांनी सोन्याचे दागिने पॅालिश करुन देतो, असे सांगितले. शिरसांगी हिने त्यांच्यावर विश्वास ठेवून या महिलेने तिच्या अंगावरील मंगळसूत्र पाॅलिश करण्यासाठी काढून त्या दोघांना दिले. याशिवाय आणखी एक सोनसाखळी ही पॉलिश करण्यासाठी दिली. मंगळसूत्र पॉलिश केल्यावर एका डब्यात घालून त्यांनी शिरसांगी हिला दिले. त्यावेळी काहीतरी गडबड झाल्याचा संशय तिला आला. कारण मंगळसूत्राचे वजन कमी झाले होते. तसेच ते मंगळसूत्र त्यांनी तिला द्रव मिश्रित डबीत घालून दिले होते. तिने या दोघांना त्याबद्दल विचारले असता हातातील साखळीच घेऊन पळ काढला.
शिरसांगी हिने या प्रकरणात जुनी गोवे पोलिसात तक्रार नोंदविली. पोलिसांनी तात्काळ शोधाशोध करून एकाला ताब्यात घेतले. त्यानंतर दुसऱ्यालाही अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले.