लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: खुनाचा प्रयत्न, दरोडा टाकणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद असलेल्या गँगस्टर विशाल गोलतकर (वय 39) याचा मृतदेह रविवारी मेरशी येथील झाडीत सापडला. प्रथमदर्शनी खून झाल्याचा संशय आल्यानंतर पोलिसांना अवघ्या १८ तासात त्याच्या खुनाचे गूढ उलगडण्यात यश आले.
मेरशी येथीलच एका अड्ड्यावर विशाल गोलतकर व इतर काहीजण दारू प्यायला बसले होते. त्या ठिकाणी क्षुल्लक कारणावरून वाद झाला. आणि वादाचे रुपांतर भांडणात व नंतर मारामारीत झाले. यावेळी विशालला ५ जणांच्या टोळक्याने मारहाण केली. धारधार सुऱ्याने त्याच्यावर वार करून त्याला ठार मारले. संशयितांनी अपनाघर जवळच्या झाडीत त्याचा मृतदेह नेऊन टाकला अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या प्रकरणी सर्व चारही जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे.
मेरशी येथील अपनाघरजवळील एका झाडीत विशालचा मृतदेह आढळून आला होता. तो रेकॉर्डवरील गुंड असल्याने पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी फॉरेन्सिक तज्ज्ञ, ठसे तज्ज्ञांना बोलावले. श्वानपथकालाही पाचारण करून तपास सुरू केला. विशालच्या मृतदेहाच्या डोक्यावर तसेच शरीरावर ठिकठिकाणी धारदार शस्त्रांच्या जखमा आढळल्या. त्यामुळे जुने गोवे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी गोमेकॉमध्ये पाठविला. ज्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे नोंद आहेत, अशांपैकी एक असलेल्या सराईत गुन्हेगार विशाल याच्याविरुद्ध ८ गुन्हे नोंद आहेत. त्यात खुनाचा प्रयत्न करणे आणि दरोडा टाकणे असे गंभीर गुन्हेही नोंद आहेत. त्याच्याविरुद्ध पर्वरी पोलिस स्थानक, जुने गोवे आणि पणजी पोलिस स्थानकात गंभीर प्रकारचे गुन्हे नोंद करण्यात झाले आहेत. नेहमी गुन्हेगारी जगतात वावरणाऱ्या विशालची परिसरात काही प्रमाणात दहशतही होती. काही लोकांचा त्याच्यावर रागही होता.
विशाल गोलतकरचे कारनामे
जून २०१७ मध्ये मुंबईहून गोव्यात आलेल्या पर्यटक कुटुंबीयांना मेरशी येथे बेदम मारहाण करण्याच्या प्रकरणात विशाल गोलतकरला अटक करण्यात आली होती. या घटनेत महिलांनाही अमानुष मारहाण करण्यात आली होती. फेब्रुवारी २०१९ मध्ये कॅरम 'खेळताना वाद झाला म्हणून विशालने गॅरेजमधील ११ वाहने आग लावून जाळली होती. जून २०२० मध्ये झालेल्या मेरशी गँगवॉर प्रकरणातही विशालला अटक करण्यात आली होती.
त्याच्याच दुचाकीवरुन टाकला मृतदेह
विशाल गोलतकरला संशयितांनी दारू अड्ड्यावर येण्यास भाग पाडले. वाद आणि मारामारीनंतर मृतदेह फेकून देण्यासाठी विशालच्या दुचाकीचा वापर केला.