पणजी, दि. 30 - गोव्यात ६१ दिवसांची मच्छीमारीबंदी उद्या सोमवारी मध्यरात्री उठणार असली तरी पावसाळ्यात गावी गेलेले खलाशी अजून परतलेले नसल्याने बहुतांश ट्रॉलर्स सोमवारी किना-यावरच राहण्याची शक्यता आहे. मालिम जेट्टीवरील बहुतांश खलाशी अजून फिरकलेले नाहीत, त्यामुळे खरा मोसम दहा ते पंधरा दिवसांनीच सुरू होणार आहे. मांडवी फिशरमेन्स को. ऑप सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा ट्रॉलरमालक मिनीन आफोंसो म्हणाले की, पावसाळ्यात गावी गेलेले ओडिशा, झारखंड, कर्नाटकचे खलाशी अजून परतलेले नाहीत, त्यांना आणखी पंधरवडा तरी जाईल. यंदा या खलाशांच्या गावात उशिरा पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे त्यांची शेतीची कामे अजून पूर्ण झालेली नाहीत. ती पूर्ण झाल्यानंतरच येणार असल्याचा निरोप काही खलाशांनी दिला आहे. मिनीन म्हणाले की, समुद्रात मासेमारीसाठी जाण्याकरिता अत्यंत चांगले हवामाने आहे, परंतु खलाशी गावाहून परतलेले नाहीत. मालिम जेटी ही गोव्यातील सर्वात मोठी मच्छिमारी जेट्टी असून, येथे ३२0 ट्रॉलर्स आहेत. खलाशांअभावी ९५ टक्के ट्रॉलर्स सोमवारी किना-यावरच राहतील. अवघ्या १0 ते १५ ट्रॉलर्सनीच मासेमारीसाठी जाण्याची सज्जता केली आहे. गोव्यात ट्रॉलर्सवर परराज्यातील खलाशांचा भरणा आहे. मान्सून सुरू होण्याआधी ट्रॉलर्स किना-यांवर आणले की हे खलाशी आपापल्या गावी जातात आणि ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यानंतरच परततात. खलाशांची समस्या ही ट्रॉलरमालकांसाठी नेहमीचीच झालेली आहे. त्यामुळे कायद्याने ३१ जुलै रोजी मासेमारीवरील बंदी उठली तरी प्रत्यक्ष मासेमारीला नारळी पौर्णिमेनंतरच वेग येतो. शेजारी महाराष्ट्र, कर्नाटकमधून बंदीकाळातही ट्रॉलर्स गोव्याच्या सागरी हद्दीत येतात आणि मच्छीमारी करतात, असा आरोप स्थानिक मच्छीमारांकडून नेहमीच केला जातो, त्यामुळे या शेजारी राज्यांमध्येही मासेमारी बंदीचा काळ समान असावा, अशी मागणी आहे.
गोव्यात उद्या मध्यरात्री मासेमारीबंदी उठणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 5:50 PM