पणजी - आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त (इफ्फी) सुमारे पाच हजाराहून अधिक प्रतिनिधींनी हजेरी लावल्याने राजधानी पणजी शहरात रोज अतिरिक्त एक टन ओला कचरा निर्माण होतो. पणजी महापालिका प्रशासनावर या कचऱ्याच्या विल्हेवाटीची जबाबदारी आली असून या कामासाठी 24 लाख रुपयांची मागणी महापालिकेने आयोजकांकडे केली आहे.
महापौर उदय मडकईकर याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले, 'इफ्फी निमित्त पुढील आठवडाभरात आठ ते नऊ हजार प्रतिनिधी शहराला भेट देणार आहेत त्यामुळे हॉटेल्स, खानावळी तुडुंब असतील. दयानंद बांदोडकर मार्गालगत पदपथावर वेगवेगळे स्टॉल्स लागले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर या काळात ओला कचरा वाढणार आहे. कचरा व्यवस्थापनासाठी कोणत्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत या संदर्भात महापौर मडकईकर त्यांना बोलते केले असता त्यांनी माहिती दिली.
मडकईकर म्हणाले की, यावर्षी कचरा संकलनासाठी महापालिकेने आयोजकांकडे 24 लाख रुपये मागितले आहेत. गेल्यावर्षी 22 लाख रुपये घेतले होते. कला अकादमी ते आयनॉक्सपर्यंतचा पदपथावरील कचरा पालिकेचे कामगार वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये उचलत असतात आणि हा रस्ता तसेच पदपथ साफ ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. मुख्य इव्हेंटच्या ठिकाणी कचरा संकलनाची जबाबदारी आयोजकांनी अन्य एका खासगी कंपनीला दिलेली आहे, तो भाग वेगळा.
इफ्फी निमित्ताने भेट देणारे प्रतिनिधी हॉटेलमध्ये उतरतात. जेवणखाणाचा ओला कचरा सुमारे एक टनाने रोज वाढतो. एरव्ही शहरात दर दिवशी सुमारे 38 टन कचरा निर्माण होतो त्यातील 28 टन कचऱ्यावर पाटो येथील एलआयसी शेजारी असलेल्या प्रकल्पात तसेच हिरा पेट्रोल पंपाजवळ असलेल्या प्रकल्पात तसेच मार्केट भागात असलेल्या कंपोस्टिंग युनिटमध्ये विल्हेवाट लावली जाते. इफ्फीसारखेच लोकोत्सव तसेच अन्य महत्त्वाचे इव्हेंट पणजी शहरात होत असतात. तेव्हाही कचऱ्याचे प्रमाण वाढते. दहा दिवस चालणारा लोकोत्सव, टुरिझम मार्ट तसेच मोठमोठी प्रदर्शने यामुळेही कचरा वाढतो व महापालिकेवर अतिरिक्त ताण येतो.
महापौर म्हणाले की, सकाळी 6 वाजल्यापासून आमचे कामगार कचरा संकलनाच्या कामाला लागतात. रात्री आठ वाजेपर्यंत कचरा उचलण्याचे काम चालू असते. यंदा प्लास्टिक बंदीची कडकपणे अंमलबजावणी केली जात आहे. पदपथावर लागणाय्रा स्टॉल्सना कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिक पिशव्या, स्ट्रॉ, कप वापरू नयेत, अशी ताकीद देण्यात आलेली आहे. प्लास्टिक कचरा होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. प्रतिनिधींची गर्दी वाढणार असल्याने परेड मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे तेथे महापालिकेने साफसफाई केली तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याने जागा मोकळी करून दिली. तेथे असलेली पाईप काढून टाकण्यात आली आहेत आणि ही जागा मोकळी करण्यात आली आहे.
दरम्यान, महापौर मडकईकर यांच्यासह शिष्टमंडळाने अलीकडेच दिल्लीत मिनी कचरा प्रकल्पांची पाहणी केली होती व तशाच प्रकारचा प्रकल्प पणजीतही आणण्यासाठी प्रयत्न चालविले होते, त्या संदर्भात विचारले असता ते म्हणाले की, दिल्लीला आम्हाला प्रकल्प दाखवला तो, भाज्यांच्या ओला कचरा यावर होणारी विल्हेवाट, परंतु गोव्यात मासळी, मांस हेच जेवणात प्रमुख घटक असतात. दिल्लीच्या प्रकल्प व्यवस्थापनाला आम्ही अशा प्रकारच्या कचय्राबद्दल विचारले तेव्हा याबाबत आम्हाला समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
लोकमतला मिळालेल्या माहितीप्रमाणे पणजी महापालिका क्षेत्रात 40 हजार एवढी लोकसंख्या आहे. गोवा हे पर्यटनस्थळ आहे आणि पणजी राजधानी शहर असल्याने महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या दुप्पट पर्यटक येथे रोज भेट देत असतात. पाण्याच्या बाटल्यांचा खप सुमारे 2 टन एवढा असून महापालिका क्षेत्रात रोज सुमारे 7 टन सुका कचरा निर्माण होतो त्यातील सुमारे अडीच टन प्लास्टिकचा असतो. प्लास्टिक बाटल्यांचे बेलिंग करून त्या कर्नाटक येथील वासवदत्ता सिमेंट कंपनीला पाठवल्या जातात. महापालिकेचा कचरा विल्हेवाटीसाठी स्वतंत्र कचरा प्रक्रिया प्रकल्प अजून नाही. येथून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बायंगीणी येथे 250 टनांचा कचरा प्रकल्प येऊ घातला आहे.