पणजी : गोव्यात पर्यटन मोसम ऐन भरात असून लाखो पर्यटक गोव्यात आलेले आहेत पण नेमक्या अशावेळी सुस्त प्रशासनामुळे किनारपट्टीत कचरा कुणी उचलावा याचा वाद निर्माण झाला आहे. अनेक किनाऱ्यांवर कचरा पडून असून सरकार कचरा उचलण्यासाठी नव्या यंत्रणेची नियुक्ती करू शकलेले नाही. दृष्टी नावाच्या जीवरक्षक यंत्रणेने कचरा उचलणे बंद केले आहे.
रुपेरी वाळूसाठी गोव्याचे किनारे प्रसिद्ध आहेत. किनाऱ्याच्या बाजूच्या काळ्याभोर खडकांवर आदळून फुटणाऱ्या सफेद लाटा लाखो पर्यटकांना मोह पाडतात. किनाऱ्यांवर शेकडो पर्यटन गाळे तथा शॅक्स उभारले गेले आहेत. या शॅकमधून पर्यटकांना गोमंतकीय पद्धतीचे व विदेशी पद्धतीचेही खाद्य पदार्थ आणि जेवण उपलब्ध करून दिले जाते. किनाऱ्यावर शॅक्सद्वारे कचऱ्याची निर्मिती होतेच, शिवाय अन्य प्रकारेही बराच कचरा तयार होतो. दृष्टी ह्या जीवरक्षक यंत्रणोला सरकारने कचरा उचलण्याचे तात्पुरते काम दिले होते. वास्तविक दृष्टी संस्था ही फक्त किनाऱ्यांवर पर्यटकांना सुरक्षा पुरविण्यासाठी आहे, पोहताना कुणी पर्यटक बुडू नये याची काळजी घेण्यासाठी आहे. मात्र पर्यटन खात्याचा आदेश मानून दृष्टी संस्थेने कचरा उचलण्याचेही काम गेले काही महिने केले. हा कचरा उचलून साळगाव येथील अत्याधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्पात पाठविला गेला. दृष्टीला सरकारने दिलेल्या आदेशाची मुदत गेल्या 12 रोजी संपुष्टात आली. त्यानंतरही एक दिवस दृष्टी संस्थेने बागा-कळंगुटच्या जगप्रसिद्ध किनारपट्टीतील शॅक्सचा कचरा उचलला व प्रकल्पात प्रक्रियेसाठी पाठवून दिला. त्यानंतर मात्र दृष्टीने कचरा उचलणे बंद केले आहे. आम्हाला सरकारने नवा आदेश दिलेला नाही व गेले काही महिने आम्हाला निधीही उपलब्ध झालेला नाही व त्यामुळे आम्ही कचरा उचलणे थांबवत असल्याचे दृष्टीने जाहीर केले. त्यानंतर आता पर्यटन खात्याची धावपळ सुरू झाली आहे. कचरा पर्यटन खाते व पर्यटन विकास महामंडळ मिळून काही कामगारांच्या मदतीने उचलील असे सरकारने आता जाहीर केले आहे पण कचरा उचलण्यासाठी प्रत्यक्ष किनाऱ्यावर कामगार नियुक्त करण्यासाठी आणखी आठ दिवसांचा कालावधी जाईल, असे सुत्रांनी सांगितले.
दरम्यान, पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी एक बैठक घेतली व कचरा उचलण्यासाठी पुढील दोन दिवसांत कृती योजना तयार करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे. गोव्यातील किनाऱ्यावर कचऱ्याची समस्या ही विद्यमान सरकारच्या गैरव्यवस्थापनामुळे झाली अशी टीका गोवा सिटीझन्स अॅक्शन फोरमच्या अध्यक्ष असलेल्या अॅड. दिया शेटकर यांनी शुक्रवारी एका प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.