लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : कोरोना काळात ज्यावेळी महामारी पसरली होती, त्या काळात ग्रामीण भागात अमृत वेल या औषधी वनस्पतीने अनेकांना दिलासा दिला होता. सदर अमृत वेल वनस्पतीची माहिती लोकांना व्हावी, या उद्देशाने अमृत वेलच्या माध्यमातून तळुले बांदोडा येथील तानाजी गावडे यांनी गरुडरुपी माटोळी साकारली आहे.
मागच्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारच्या माटोळी स्पर्धेत सहभागी होऊन बक्षिसे प्राप्त करणाऱ्या तानाजी यांची माटोळी संपूर्ण तालुक्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. शुक्रवार दि. १३ सप्टेंबरपर्यंत ही माटोळी लोकांना पाहण्याकरिता त्यांच्या घरी उपलब्ध असेल, असे तानाजी यांनी सांगितले आहे.
यावर्षी माटोळी साकारताना तानाजी व त्यांच्या कुटुंबीयांनी जास्तीत जास्त जंगलात मिळणाऱ्या रानटी व औषधी फळफळावर, मूळ, वेली, शेंगा, तुरे यांच्यावर भर दिला आहे. औपचारिकता व पारंपरिकता म्हणून बाजारात मिळणारी क्वचित काही फळे त्यांनी बांधलेले आहेत. अन्यथा ९० टक्के भार हा जंगलात मिळणाऱ्या गोष्टीवर देण्यात आलेला आहे. ही रानटी फळे, मुळे, वेली गोळा करण्यासाठी तानाजी व त्यांच्या मित्रांनी चोर्ला घाट, अनमोड घाट इत्यादी भागात पायपीट करून नैसर्गिक गोष्टी गोळा केल्या आहेत. गणेश चतुर्थीच्या पंधरा दिवस अगोदरपासून त्यांची जंगलात भ्रमंती चालू केली होती व जंगलातील ज्या काही औषधी गुणधर्म आहे, त्या वनस्पर्ध, फळे गोळा केली होती.
लोकांना अमृत वेलीचे महत्त्व कळावे म्हणून यावेळी माटोळीमध्ये जास्तीत जास्त अमृत वेलीचा वापर करण्यात आलेला आहे. माटोळीच्या माध्यमातून सुबक अशी गरुड रुपी प्रतिमा भाविकांना पाहावयास मिळत आहे. कलात्मक पद्धतीने तानाजी व त्यांच्या मित्र परिवाराने ही माटोळी बांधून घेतलेली आहे.
३६ तासांचा वेळ
तानाजी यांना ही माटोळी बांधण्यासाठी ३६ तास लागले. माटोळी एकदा बांधून घेतल्यानंतर त्यातील एखादे जरी फळ खाली पडले, तर संपूर्ण कलात्मकता भंग होऊ शकते म्हणून बांधताना योग्य ती काळजी घेऊनच ती बांधण्यात आलेली आहे, अशी माहिती तानाजी गावडे यांनी दिली.