मडगाव: राजबाग काब द राम समुद्रात आपली पत्नी दिक्षा हिला बुडवून ठार मारणारा गौरवची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.आज गुरुवारी त्याला न्यायालयात उभे केले असता, त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणात आली. नंतर त्याला कोलवाळ येथील तुरुगांता पाठवून देण्यात आले. १९ जानेवारी रोजी खुनाची वरील घटना घडली होती. संशयित व मयत या दोघेही मूळ उत्तर प्रदेश राज्यातील लखनै येथील रहिवाशी आहेत. गौरव हा कोलवा येथील एका तीनतारांकीत हॉटेलात रेस्टॉरन्ट मॅनेजर म्हणून कामाला होता. विवाहाला दीड वर्षे लोटूनही तो आपली पत्नी दिक्षाला नांदवायला तयार नव्हता. विवाहाला हुंडा घेउनही त्याने कार घेण्यासाठी तिच्याकडे पैशाचा तगादा लावला होता. आपल्या मुलीचा खून हा हुंडयासाठी केला असल्याची तक्रारही मयताच्या वडिलाने पोलिसांकडे केली होती.
जानेवारी महिन्यात दिक्षा गोव्यात गौरवकडे राहायला आली होती. गौरवचे एका युवतीशी प्रेमप्रकरणही होते. आपले हे संबध बाहेर पडू नये यासाठी त्याने दिक्षाला फिरायला जाण्याचा बहाणा करुन दुचाकीवरुन काब द राम येथे नेले होते. तेथे एका खडकाच्या बाजूने जाउन तिने तिला पाण्यात बुडवून ठार केले होता. नंतर तो पाण्यातून बाहेर आल्यानंतर थोडयाच वेळात दिक्षाचा मृतदेह पाण्याच्या बाहेर तंरगू लागल्याने व किनाऱ्यावर हजर असलेल्या अन्य जणांनी तो पाहिल्यानंतर या खुनाला वाचा फुटली होती. भादंसंच्या ३०२ कलमाखाली खुनाचा गुन्हा नोंद करुन गौरवला अटक केल्यानंतर पुढील तपासासाठी त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आली होती. कोठडीची ही मुदत आज संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात उभे केले असता संशयिताला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.