पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी-गोवा: दिवाळी निमित बाजारात गावठी पोहे दाखल झाले असून ते ८० रुपये किलो या दराने मिळत आहेत. दिवाळीला दोन दिवस असताना या किंमतीत आणखीन वाढ शक्य आहे.
दिवाळीला अवघेच काही दिवस बाकी असून त्यानिमित बाजारपेठ सजू लागली आहे. आकाशकंदिल, रंगबिरंगी पणत्या, विद्युतरौषणाई, सजावटीचे साहित्य आदी साहित्य दाखल झाले आहे. आकाशकंदील आकारानुसार १२० रुपयांपासून ते ८०० रुपयांपर्यंत आहेत. दिवाळीचे साहित्य खरेदी करण्यासाठी लोक बाजारात गर्दी करु लागले आहेत. याशिवाय नरकासुर मुखवटेही विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
दिवाळीत वेगवेगळा फराळ तयार केला जातो. यात चकली, शेव, शंकरपाळी, अनारसे यासारख्या विविध गोड पदार्थांचा समावेश असतो. दिवाळीत वेगवेगळ्या प्रकारचे पोहे तयार केले जातात. यात विशेष करुन गावठी पोह्यांचा समावेश आहे. त्यापासून गोड पोहे, तिखट पोहे, ताकातले पोहे , दुधातले पोहे आदीचा समावेश आहे. खास दिवाळी काळातच गावठी पोहे बाजारात मिळतात. सध्या ते ८० रुपये किलो मिळत आहेत.