ऑनलाइन लोकमतपणजी, दि. २७ - गोवा क्रिकेट असोसिएशनशी केलेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून गोवा पोलिसांना देण्यात आली आहे. त्यामुळे जीसीए घोटाळा प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला आहे.
जीसीए प्रकरणाचा सर्व तपास जवळ जवळ पूर्ण झालेला असून पोलिसांना हवी असलेली महत्त्वाची कागदपत्रेही बीसीसीआयने पाठविली आहेत. जीसीएशी झालेल्या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती देणारी कागदपत्रे बीसीसीआयने पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाला पाठविली आहेत. सोमवारी ही कागदपत्रांसह माहिती पोलिसांना मिळाल्याची माहिती पोलीस मुख्यालयातून देण्यात आली.
बीसीसीआयने पाठविण्यात आलेल्या दस्ताऐवजात आॅक्टोबर २००६ मध्ये देण्यात आलेला २.८७ कोटी रुपयांच्या धनादेशाची झेरॉक्स प्रतही आहे अशी माहिती विशेष सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणात आरोपत्रही लवकर ठेवण्यात येणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हा विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच बीसीसीआयचे सचीव अजय शिंक्रे यांची जबानीही नोंदविण्यात येणार आहे. या प्रकरणात बहुतेक जबान्या नोंदवून झाल्या आहेत.
आरोपपत्र ठेवण्यास पुरेसे पुरावे पोलिसांनी गोळा केले असल्याचा पोलिसांचा दावा आहे, परंतु जीसीएच्या बैठकीची इतिवृत्त वही अजून मिळाली नसल्यामुळे अडचण झाली आहे. जीसीएच्या दोन्ही इमारतींवर तसेच अटक करण्यात आलेल्या पदाधिकाºयांच्या घरांवर टाकलेल्या छाप्यांच्यावेळीही इतिवृत्त वही पोलिसांना सापडली नाही.