पणजी: अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली अल्पकाळासाठीची ऋण योजना सुटसुटीत करण्यात आली असून, २४ तासात कर्ज वितरीत होईल, याची खबरदारी घेण्यात आली आहे. या योजनेंतर्गत १ लाख रुपये २ टक्के व्याज दराने कर्ज दिले जाते. परंतु योजनेसाठी अर्जदार प्रक्रिया पार पाडेपर्यंत आणि प्रत्यक्ष कर्ज मिळेपर्यंत सहा महिने उलटून जात होते. त्यामुळे ही योजना सोपी व सुटसुटीत करण्यात आली आहे.विशेष म्हणजे आर्थिक विकास महामंडळाकडून ही योजना थेट अनुसूचित जाती-जमात महामंडळाकडे देण्यात आली आहे. यापुढे सर्व प्रक्रिया ही महामंडळातर्फेच केली जाणार आहे, अशी माहिती अनुसूचित जाती व जमात विकास मंत्री गोविंद गावडे यांनी दिली. या योजनेंतर्गत मिळालेले कर्ज २० महिन्यांत परत फेडणे आवश्यक आहे.आश्रय आधार योजनासरकारने आश्रय आधार योजना अधिसूचित केली असून या योजनेअंतर्गत ५ लाख रुपयापर्यंतचे आर्थिक सहाय्य कर्जाच्या रुपाने दिले जाणार आहे. या कर्जावर २ टक्के व्याज असून, कर्जाची परतफेड ही १० वर्षांत करायची आहे. हे कर्ज घराच्या दुरुस्तीसाठी किंवा घर बांधण्यासाठी आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत ३३४३ लोकांना मिळून ४१.७० कोटी रुपये रकमेचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.वर्ष २०१८ मध्ये महामंडळाकडून एकूण ३७७.५३ लाख रुपये कर्जाचे वितरण करण्यात आल्याची माहिती गावडे यांनी दिली. त्यात आश्रय आधार योजनेंतर्गत १७०.०३ लाख, स्वयंरोजगारासाठी १९१.१७ लाख अणि अल्पकाळासाठीचे कर्ज १६.३३ लाख रुपयांच्या कर्जाचा समावेश आहे. एकूण लाभार्थींची संख्या १३४ आहे.
२४ तासांत १ लाख कर्ज मिळवा, अनुसूचित जाती-जमातीसाठीची कर्ज प्रक्रिया केली गतिमान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2019 9:07 PM