लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : पोर्तुगिजांच्या खाणाखुणा पुसण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी योगी सरकारकडून शंभर बुलडोझर भाड्याने गोव्यात आणावेत. तसेच बॉम्बगोळ्यांसाठी केंद्र सरकारची मदत घ्यावी, असा मार्मिक सल्ला ज्येष्ठ साहित्यिक उदय भेंब्रे यांनी दिला आहे. आपल्या खास शैलीत भेंब्रे यांनी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा समाचार घेतला आहे. भेंब्रे यांच्या जागोर कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मुख्यमंत्री सावंत यांनी पोर्तुगिजांच्या खाणाखुणाच नष्ट करण्याचा आदेश दिला आहे, असे नमूद करून भेंब्रे म्हणतात की, गोव्यात पोर्तुगिजांच्या खाणाखुणा खूप आहेत. आपण त्याची यादी मुख्यमंत्र्यांना देतो, त्यांनी या खुणा नष्ट करण्यास आरंभ करावा असा सल्ला देऊन भेंब्रे म्हणाले की, खाणाखुणा पुसण्यासाठी सावंत यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून बॉम्बर विमान मागवून घ्यावे. अनेक डायनामाइट एकत्र करून सरकारी गोदामात ठेवावेत. बॉम्बरचा वापर करून राजभवन उडवून टाकावे, कारण ते राजभवन पोर्तुगिजांनीच बांधलेले आहे, असे भेंब्रे म्हणतात.
मुरगाव बंदर, दाबोळी विमानळ हेदेखील पोर्तुगिजांनी उभे केले. ते मुख्यमंत्र्यांनी उद्ध्वस्त करावे. जुन्या गोव्यात प्लेगची साथ आल्यानंतर पोर्तुगिजांनी पणजी राजधानी बनविली होती. आताही हीच राजधानी आहे. या शहराची निर्मिती केली होती ती पुसून टाकावी. त्यासाठी बुलडोझर व डायनामाइटचा वापर करावा, कांपाल येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इमारत, फाजेंता कार्यालय इमारत, मळा येथील पोर्तुगीज स्थापत्य कला, दोनापावला येथील एक शिल्प, रायबंदर-पाटो, जुने गोवे येथील व्हाईसरॉय आर्क हे नष्ट करावे. यासाठी डायनामाइटचा बॉम्ब वगैरेंचा वापर करावा, असा सल्ला भेंब्रे यांनी दिला आहे.
- भाजपशासित अन्य राज्ये समान नागरी कायदा लागू करू बघतात, त्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊ नये. कोकणी भाषेत अनेक पोर्तुगीज शब्द आहेत. तेही गाळावे, त्याला शुद्धिकरण चळवळ म्हणूया, नवा गोवा निर्माण करूया.
- पोर्तुगीज स्थापत्य कला असलेली घरे, चांदर, कासावली व लोटली व अन्य ठिकाणी ही घरे आहेत, ती नष्ट करावीत, असे भेंब्रे यांनी म्हटले आहे.
हेही उद्ध्वस्त कराच
हातकातरो खांबानंतर पुरातत्त्व खात्याच्या संग्रहालयातील आफ़ोन्स द आल्बुकेर्क व कवी लुईश द कामोईश यांचे पुतळेही मोडून टाकावेत, केपे धरण मोडावे, पोर्तुगिजांचा विवाह, घटस्फोट, इनहेरीट ऑफ सक्सेशन वील या कायद्यावरही खास लक्ष द्यावे लागेल. हे सर्व नष्ट करण्यासाठी आणखी एक नवीन फतवा लवकर काढावा लागेल, असेही भेंब्रे म्हणाले.