- सुशांत कुंकळयेकर
मडगाव - पोर्तुगीज पासपोर्टमुळे युरोपची दारे खुली होत असल्याने कित्येक गोमंतकीयांसाठी हे पासपोर्ट सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरल्याने मोठ्या प्रमाणावर गोमंतकीयांनी स्वत:ला पोर्तुगालचे नागरिक होण्याचा मार्ग पत्करला आहे. गोव्यात पोर्तुगीज पासपोर्टधारक नेमके किती आहेत याची आकडेवारी कुणाकडेही नक्की मिळत नाही. असे जरी असले तरी हा आकडा निश्चित लाखोंच्या घरात असणार असे सांगण्यात येते.
पूर्वाश्रमीच्या पोर्तुगीज कॉलनीतल्या नागरिकांच्या वंशजांना पोर्तुगीज नागरिकत्व घेता येते, अशी तरतूद पोर्तुगालच्या घटनेत असल्याने त्याचा फायदा केवळ गोमंतकीयांनीच उचलला आहे. असे नव्हे तर पूर्वी गोव्यात समाविष्ट असलेले दमण व दीव हे आताचे संघप्रदेश हेही एकेकाळी पोर्तुगाली कॉलनीचा भाग असल्याने मोठ्या प्रमाणावर गुजराती नागरिकांनीही या सुविधेचा लाभ उठविला आहे. त्यामुळे पोर्तुगीज पासपोर्टधारक नेमके गोमंतकीय किती आणखी परराज्यांतील नागरीक किती याचाही तपशील कुठल्याही यंत्रणेकडे नाही. असे जरी असले तरी प्रत्येक वर्षी किमान दोन हजार लोकांची या पोर्तुगीज पासपोर्ट धारकांमध्ये भर पडते असे सांगण्यात येते.
मध्यंतरी पोर्तुगीज पासपोर्टच्या या प्रश्र्नाने गोव्याच्या राजकारणातही धुमाकूळ घातला होता. दक्षिण गोव्यातील बाणावली या विधानसभा मतदारसंघाचे आमदार कायतान सिल्वा हे पोर्तुगीज पासपोर्टधारक असल्याने त्यांचे भारतीय नागरिकत्व केंद्रीय गृहमंत्र्यालयाकडून रद्दही करण्यात आले होते. त्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात आली होती. मात्र या प्रश्र्नावरुन सिल्वा यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढत देऊन आपली आमदारकी शाबूत ठेवली होती. केवळ सिल्वा हेच नव्हे तर उत्तर गोव्यातील हळदोणा मतदारसंघाचे आमदार ग्लेन टिकलो हेही पोर्तुगीज नागरीक असल्याचा दावा करुन त्यांच्याही आमदारकीला आव्हान देण्यात आले होते. हा प्रश्र्न केवळ राजकारण्यांपुरता मर्यादित नव्हता तर कित्येक उद्योजक आणि कलाकारांनीही ही सवलत घेतल्याने गोव्यातील मतदार यादीतून त्यांची नावे रद्द करावीत यासाठी अर्जही करण्यात आले होते. गोव्याचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पॉप गायक रेमो फर्नांडिस हे पोर्तुगीज नागरीक असूनही गोव्यात त्यांची विधानसभा निवडणुकीचे मतदार आयकॉन म्हणून निवड केल्यामुळे हेही प्रकरण काही वर्षापूर्वी गोव्यात बरेच गाजले होते.
गोवा पोलिसांच्या विदेश विभागाचे अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांच्याशी यासंबंधीची आकडेवारी मागितली असता, गोवा पोलिसांकडे केवळ पोर्तुगीज व्हिसासाठी जे अर्ज करतात त्यांचीच माहिती येत असल्यामुळे गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट धारकांचा नेमका आकडा किती हे नक्की कळणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. गोवा पोलिसांकडे नक्की आकडेवारी उपलब्ध नसली तरी पणजीतील पोर्तुगीज दुतावासाच्या दारात दररोज ३00 ते ४00 लोकांची रांग लागलेली असते. यातील प्रत्येकजण पोर्तुगीज पासपोर्ट मिळविण्यासाठीच येत आहेत असे जरी नसले तरी बहुतेकजण याच कामासाठी आलेले असल्याने गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट धारकांच्या आकड्याने नक्कीच एक लाखाची संख्या ओलांडल्याची शक्यता संबंधित सुत्राकडून व्यक्त करण्यात येत आहे.