लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : येत्या दिवाळीला नरकासुराचा उदो उदो करू नका, आम्हाला वाईट शक्तींचा नाश करायचा आहे. राजकारणातही वाईट शक्तींचा सुळसुळाट आहे. त्यामुळे त्या नरकासुरांना बाजूला काढा, असे आवाहन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.
वास्को मतदारसंघातील स्वातंत्र्यपथ मार्गावरील परिसरात ९ कोटी ४१ लाख रुपये खर्चाच्या भूमिगत वीज वाहिनी प्रकल्पाची पायाभरणी मंत्री ढवळीकर यांच्या हस्ते काल करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत आमदार कृष्णा साळकर, नगराध्यक्ष गिरीश बोरकर, नगरसेविका शमी साळकर, दीपक नाईक, दामू कासकर, प्रजय मयेकर, मंजूशा पिळणकर, सुदेश भोसले, बायणा रवींद्र भवनाचे चेअरमन जयंत जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मंत्री ढवळीकर म्हणाले, मुरगाव पालिका हद्दीतील अर्ध्या भागात यापूर्वीच भूमिगत वीज वाहिनी घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता ९.४१ कोटी खर्चून स्वातंत्र्यपथ मार्गावरील भूमिगत वीज वाहिन्या घालण्याचे काम सुरू झाले असून, येत्या तीन महिन्यांत ते पूर्ण होणार आहे. वास्कोत भूमिगत वीज वाहिनींचा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी आमदार कृष्णा साळकर यांनी परिश्रम घेतले आहे.
मी फक्त माझ्या मतदारसंघापुरताच काम न करता संपूर्ण गोव्याच्या विकासासाठी काम करतो. गोव्यात वीज क्षेत्रात विकास करण्यासाठी मला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा पूर्ण पाठिंबा आहे. वास्कोतील स्वातंत्र्यपथ मार्गावर भूमिगत वीज वाहिन्या घालण्याच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर रस्त्यावर खड्डे मारण्यात येणार आहेत. काही महिन्यांसाठी लोकांना त्रास होईल. परंतु, भविष्याचा विचार केल्यास त्याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे लोकांनी वीज विभागाला सहकार्य करावे, अशी विनंतीही ढवळीकर यांनी केली.
वास्कोचे आमदार कृष्णा साळकर म्हणाले, स्वातंत्र्यपथ मार्गावरील भूमिगत वीज वाहिनी घालण्याच्या कामाबरोबर लवकरच शहरातील तिन्ही रस्त्यावरील परिसरातही भूमिगत वाहिन्या घालण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात वीज क्षेत्राचा उत्तम विकास करण्यासाठी उत्कृष्ट पावले उचललेली आहेत. मंत्री सुदिन ढवळीकर यांची त्याच दिशेने वाटचाल आहे.
भूमिगत वीज वाहिन्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा मोठा फायदा होणार आहे. नरकासुर स्पर्धेवेळी होणारा त्रास यामुळे बंद होईल. आता दिवाळीत नरकासुराचा उदो उदो करू नका, नरकासुराला जाळा, त्याचबरोबर राजकारणातील नरकासुरांनाही बाजूला काढा, असे आवाहन केले.
वास्कोत लवकरच २२ नवे ट्रान्स्फॉर्मर
वास्कोतील वीज खात्याचे २२ जुने ट्रान्स्फॉर्मर बदलून तिथे नवीन ट्रान्स्फॉर्मर घालण्यात येतील. पुढच्या दोन-तीन वर्षांत वास्कोत वीज क्षेत्रात मोठा विकास होणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनंतर वास्कोत उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुल प्रकल्पाची निविदा तयार करण्यात येणार आहे. त्या क्रीडा संकुलात फुटबॉल, व्हॉलिबॉल, बॅडमिंटन, वॉकिंग ट्रॅक, आदी विविध सुविधा उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती आमदार दाजी साळकर यांनी दिली.