लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : येत्या सोमवारपासून सुरू होणार असलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मंत्री व सत्ताधारी आमदार यांच्या दोन वेगवेगळ्या स्वतंत्र बैठका घेऊन मार्गदर्शन केले. सर्वांना 'कामाला लागा', असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
विरोधी आमदारांना घेरण्याची संधी मिळू नये, यासाठी मंत्र्यांनी आपल्या खात्याच्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करूनच यावे. काही बाबतीत आकडेवारीही तयार असायला हवी. मंत्र्यांनी याअनुषंगाने सभागृहात तयारी करूनच यावे, असे मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातील सहकारी मंत्र्यांना सांगितले.
कला अकादमी नूतनीकरणाचा उडलेला बोजवारा, स्मार्ट सिटीच्या कामांमुळे राजधानी शहराची झालेली दुर्दशा, म्हादईच्या बाबतीत आलेले अपयश, वाढती बेरोजगारी आदी प्रश्नांवर विरोधी आमदारांनी सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित केली होती.
सभागृहात सत्ताधारी आमदार, मंत्र्यांमध्येही समन्वय असावा, याकरिता काय करावे आणि काय करू नये, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री पूर्वी दर शुक्रवारी सत्ताधारी मंत्री, आमदारांची बैठक घेत असत; परंतु अलीकडे या बैठका बंद झाल्याने काहीसा संवाद खुंटल्यासारखी स्थिती आहे. काही आमदार खासगीत अशी तक्रार करायचे की, मंत्री आपले फोन कॉल्स स्वीकारत नाहीत.
डीजीपींची दोन दिवसात बदली
आसगावच्या प्रकरणात पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांची पुढील दोन दिवसात बदली होण्याची शक्यता आहे. तसे संकेत बैठकीत देण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते.
सध्या तरी मंत्रिमंडळ फेररचना नाही
बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले की, सध्या तरी मंत्रिमंडळ फेररचनेचा विचार नाही. विधानसभा अधिवेशनावरच आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. सरकारी विधेयके, खात्यांचे विषय, तसेच अर्थसंकल्पावरील चर्चेच्या अनुषंगाने ही बैठक होती.'
'विरोधकांसारखे बोलू नका'
विरोधकांसारखे बोलू नका, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी सत्ताधारी आमदारांना दिला, विधानसभेत विरोधकांसारखे बोलू नये किंवा सरकारवर आरोप करू नयेत. बैठकीत टॅक्सीवाल्यांचे प्रकरण तसेच नगर नियोजन कायद्याचा विषय व मुरगाव बंदरातील संकल्प हे आमोणकर यांचे प्रकरणही चर्चेला आल्याची माहिती मिळते.
दिल्लीला स्वतंत्रपणे जाऊ नका
काही मंत्री दिल्लीत स्वतंत्रपणे जाऊन केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतात त्यावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची खात्रीलायक माहिती मिळते. दिल्लीला जाताना मंत्री, आमदारांनी आधी आपल्याशी बोलावे किंवा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना विश्वासात घ्यावे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे समजते. अलीकडेच आमदार दिगंबर कामत, मंत्री मॉविन गुदिन्हो, सभापती रमेश तवडकर यांनी स्वतंत्रपणे दिल्लीत मंत्र्यांची भेट घेतली होती.