पणजी : चतुर्थी सणाची कल्पना गोव्यात घमुटाशिवाय करताच येत नाही. चतुर्थी सण आता अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असून अशावेळी गोवा सरकारने गोमंतकीय कलाकारांना एक खूशखबर दिली आहे. घुमटाला गोमंतकीय लोकवाद्याचा दर्जा बहाल करणारा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे.
चतुर्थीवेळी गोव्यात घुमट आरत्या अत्यंत रंगतात. गोव्यात येणा-या पर्यटकांनाही गोव्यातील घुमट आरती भुरळ घालते. गोव्यात दीड दिवस, पाच दिवस, सात ते अकरा दिवसही घरात चतुर्थीवेळी गणेशमूर्ती पुजली जाते. चतुर्थी हा दिवाळीपेक्षाही गोमंतकीयांसाठी मोठा सण मानला जातो. एखाद्या कुटुंबात तर एकवीस दिवसही गणेश मूर्ती ठेवून मग विसजर्न केले जाते. गणेशोत्सव काळात काही घरात सत्यनारायण पुजाही ठेवली जाते. दुपारी व रात्री घुमट घेऊन आरत्या व भजन करणे गोमंतकीयांना खास आवडते.
गोव्यात घुमट वादनाचे अनेक प्रकार आहेत. घुमट वाजविण्याबाबत तरबेज असलेले कलाकार गोव्यात गावोगावी सापडतात. पणजीत सध्या अष्टमीची फेरी भरलेली आहे. तिथे घुमट विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. येत्या दि. 2 पासून गणोशोत्सवाला आरंभ होईल. मग प्रत्येक घरातून घुमटाचे स्वर कानी येऊ लागतील. घुमटाला गोमंतकीय लोकवाद्याचा अधिकृत दर्जा सरकारने द्यावा असे कलाकारांना सतत वाटत आले. सरकारने यावेळी ही मागणी पूर्ण केली आहे.
सोमवारी गोवा सरकारने घुमटाला लोकसंगीतामधील वाद्य म्हणून अधिकृत दर्जा दिला. पूर्वी घोरपडीच्या कातडीपासून घुमट बनविले जात होते. आता तसे करण्यावर बंदी आहे. त्यामुळे घोरपडीच्या कातडीपासून जे घुमट तयार केलेले नाही, अशाच घुमटाला सरकारने लोकवाद्याचा दर्जा दिला आहे, असे सरकारी सुत्रंनी स्पष्ट केले. कला व संस्कृती खात्याने घुमटाविषयीचा प्रस्ताव आणला होता व सरकारने तो मंजूर केला.