लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : फोंडा पत्रकार संघ, गिरिजाताई केळेकर संगीत संमेलन समिती व कला व संस्कृती संचालनालय यांच्या सहकार्याने आजपासून ते ३डिसेंबरपर्यंत असे तीन दिवस स्वरसम्राज्ञी गिरिजाताई केळेकर ३५ वे संगीत संमेलन साजरे होणार आहे. संमेलन दरवर्षीप्रमाणे यंदाही फर्मागुडी येथील श्री गोपाळ गणपती मंदिर परिसरात आयोजित केले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत संमेलन समितीचे अध्यक्ष जयंत मिरींगकर यांनी दिली.
यावेळी पत्रकार परिषदेत फोंडा पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र तारी, स्वागत समिती अध्यक्ष नारायण नावती तसेच धर्मानंद गोलतकर तसेच प्रसिद्ध गायक रघुनाथ फडके उपस्थित होते. आज संध्याकाळी ५:३० वाजता उद्घाटन सोहळा होणार आहे. यावेळी संमेलनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच सन्मानीय पाहुणे म्हणून वीज खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर उपस्थित असतील. याशिवाय कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे खास पाहुणे म्हणून कला व संस्कृती संचालनालयाचे संचालक सगुण वेळीप, प्रमुख वक्ते म्हणून 'लोकमत'चे संपादक सद्गुरु पाटील, बांदोडा पंचायतचे सरपंच सुखानंद गावडे, आयोजन समितीचे अध्यक्ष जयंत मिरींगकर, संमेलन स्वागत अध्यक्ष नारायण नावती व अन्य मान्यवर उपस्थित असतील.
उद्घाटन सोहळ्यानंतर पंडित शास्त्री शास्त्री, गायक पंडित आनंद भाटे यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होईल. यावेळी त्यांना संगीत दत्तराज सुर्लकर संवादिनीवर तर दयानिधेश कोसंबे तबल्यावर साथसंगत करणार आहेत. शनिवारी तिसरे सत्र संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार असून, यात शास्त्रीय गायक कलाकार डॉ. पंडित जयतीर्थ मेहुंडी यांचे गायन होईल.
उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सत्कार सोहळा व 'स्वरांजली'चे प्रकाशन होणार आहे. यावेळी कलाप्रेमी म्हणून देवेंद्र वालावलकर यांचा आयोजन समितीतर्फे सत्कार केला जाईल. ज्येष्ठ गायक कलाकार चेडो परवार यांचा रघुनाथ फडके पुरस्कृत पंडित जितेंद्र अभिषेकी स्मृती पुरस्काराने सत्कार केला जाणार आहे. घाटे परिवार पुरस्कृत स्व. लक्ष्मीकांत घाटे ट्रस्टचा पुरस्कार यंदा ज्येष्ठ संवादिनी वादक कलाकार रामकृष्ण सुर्लकर यांना देण्यात येणार आहे.
शनिवारी पहिले सत्र संध्याकाळी ५ वाजता सुरू होणार असून, यात शास्त्रीय गायक कलाकार तेजा गावकर ढवळीकर यांचे गायन होईल. त्याच दिवशी दुसरे सत्र संध्याकाळी ६ वाजता सुरू होणार असून, या पखवाज जुगलबंदीचा आस्वाद रसिकांना घ्यायला मिळणार असून, यात कलाकार कृष्णा साळुंखे, रोहित खवळे, यशवंत थिट्टे सहभागी होणार आहे.