पणजी - मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे अपरिपक्व अशी विधाने करत आहेत. रोजगार निर्मिती हा निवडणुकीचा विषयच होऊ शकत नाही असे विधान मुख्यमंत्र्यांनी करून पणजीतील बेरोजगार युवकांची थट्टा केली आहे. त्यांनी क्रुर विनोदच केला आहे, अशी टीका गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मंगळवारी येथे केली.
काँग्रेस हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना चोडणकर म्हणाले, की पणजीतील पोटनिवडणुकांमध्ये रोजगार निर्मिती हा चर्चेचा व प्राधान्याचा विषय नाही असे विधान मुख्यमंत्र्यांनी नुकतेच केले आहे. म्हणजेच रोजगार निर्मितीचा विषय हा सरकारच्या अजेंडय़ावर नाही असे सावंत म्हणतात. एवढे बेजबाबदार विधान मुख्यमंत्री पदावर असलेल्या नेत्याने तरी करू नये. पणजीत असलेली बेरोजगारीची समस्या मुख्यमंत्र्यांना दिसतच नाही. युवकांमध्ये बरीच बेरोजगारी आहे. त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती करणो हे सरकारचे प्राधान्य असायलाच हवे. पणजीत आता होत असलेल्या पोटनिवडणुकीमध्ये रोजगाराचा विषय नाही असे म्हणणो हे धक्कादायक आहे, असे चोडणकर म्हणाले.मुख्यमंत्रीपदाला त्यांचे विधान शोभत नाही. आम्ही त्यांच्या विधानाचा अतिशय तीव्र शब्दांमध्ये निषेध करतो, असेही चोडणकर म्हणाले. कारवार व कर्नाटकच्या लोकांनी गोव्यात येऊन रोजगार संधी मिळवावी असे मुख्यमंत्री म्हणतात पण पणजीतील बेरोजगारांसाठी रोजगाराची निर्मिती करायला हवी असे ते म्हणत नाही. आपण आता मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आहोत याची जाणीवच अजून सावंत यांना झालेली नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून ते अशाच प्रकारे बेजबाबदार विधाने करत आले आहेत, असेही चोडणकर म्हणाले. रोजगाराऐवजी विकास करणो एवढाच निवडणुकीत विषय असल्याचे मुख्यमंत्री सांगतात. विकास म्हणजे निधीचा वापर व भ्रष्टाचार एवढेच मुख्यमंत्र्यांना अपेक्षित आहे काय असे आपण विचारतो. कारण मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी जीएसआयडीसीवरही काम केले आहे व त्यांना विकास म्हणजे काय ते ठाऊक आहे, अशीही टीका चोडणकर यांनी केली.