दिगंबर कामतांचा काय दोष?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2024 08:08 AM2024-05-23T08:08:14+5:302024-05-23T08:09:55+5:30
या टीकेतून त्यांनी कामत यांचे गुण किंवा अवगुण जसे दाखवले, त्याच पद्धतीने त्यांनी अप्रत्यक्षरीत्या काँग्रेसच्या नेतृत्वाचाही कमकुवतपणा अधोरेखित केला आहे.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे वजन आता काँग्रेसच्या केंद्रीय वर्तुळात वाढू लागले आहे. मात्र चोडणकर यांनी परवा मंगळवारी बोलताना दिगंबर कामत यांना जो दोष दिला, त्याविषयी चर्चा गरजेची आहे. माजी मुख्यमंत्री कामत यांनी काँग्रेसचा सत्यानाश केला, अशा शब्दांत चोडणकर यांनी मडगावच्या आमदाराला जबाबदार धरले आहे. या टीकेतून त्यांनी कामत यांचे गुण किंवा अवगुण जसे दाखवले, त्याच पद्धतीने त्यांनी अप्रत्यक्षरीत्या काँग्रेसच्या नेतृत्वाचाही कमकुवतपणा अधोरेखित केला आहे.
कामत यांनी २००५ साली भाजपमधून काँग्रेसमध्ये उडी टाकली आणि लगेच २००७ साली त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारचे गोव्यात मुख्यमंत्रिपद मिळाले. त्यावेळची राजकीय स्थितीच अशी बेताची, अस्थिरतेची होती की, कामत यांच्याकडे नेतृत्व सोपविण्याशिवाय पर्यायच नव्हता. प्रतापसिंग राणे पुन्हा मुख्यमंत्रिपदी राहिलेले रवी नाईक व गटाला नको होते, रवी मुख्यमंत्री झालेले विश्वजित राणे व सुदिन ढवळीकर यांच्या गटाला नको होते. त्यावेळी म. गो. पक्ष आणि अपक्षांवर सरकारचा डोलारा होता. मग पर्याय म्हणून कामत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. गिरीश चोडणकर यांनी काँग्रेसच्या सगळ्या नुकसानाला कामत जबाबदार
आहेत, असे म्हटले आहे.
एक गोष्ट खरी की, २००५ ते २००७ हा काळ गोव्यातील काँग्रेसच्या अधःपतनाला कारणीभूत ठरला. काँग्रेसला सत्तेचा वापर पक्ष मजबूत करण्यासाठी करता आला नाही. तसे पाहायला गेल्यास काँग्रेसच्या गोव्यातील कोणत्याच मुख्यमंत्र्याने कधी जीव तोडून पक्षासाठी काम केले नाही किंवा आपले सर्वस्व पक्षाला दिले नाही. गोव्यात काँग्रेस मजबूत करण्यात राणेदेखील खूप कमी पडले. मनोहर पर्रीकर, लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याप्रमाणे प्रमोद सावंतही मुख्यमंत्रिपदी राहून आपल्या पक्षाचे काम नेटाने करत आहेत. ती शिकवण भाजपच्या संघटनेमधूनच येते. काँग्रेसकडे तशी शिकवण किंवा संस्कार देण्याची व्यवस्थाच नाही. त्यामुळे काँग्रेस देशभर मार खात आहे.
काँग्रेसचा गोव्यातला कोणताच मंत्री सहसा पक्षासाठी काम करताना दिसत नाही, हा ८०-९० च्या दशकातला अनुभव आहे. सर्वाधिक वर्षे गोव्यात सत्तेत राहूनदेखील काँग्रेस स्वतःच्या कार्यालयासाठी चांगली सुसज्ज जागा पाहू शकला नाही. चांगली मोठी जागा विकत घेऊ शकला नाही. अजूनही काँग्रेस हाऊस भाड्याच्या जागेत चालते. आतापर्यंतच्या काँग्रेसच्या सर्व सत्तातूर नेत्यांना याचा दोष द्यावा लागेल, एकट्या कामत यांनी काँग्रेस कमकुवत केली नाही तर काँग्रेसचे आतापर्यंतचे अनेक प्रदेशाध्यक्षही त्याला कारणीभूत ठरले आहेत. काँग्रेसचे काही मंत्री पूर्वी आपल्या कार्यकर्त्यांनाही फुकट नोकऱ्या देत नव्हते. नोकऱ्यांचा लिलाव होत होता. काँग्रेसचे तिकीट वाटपदेखील काहीवेळा मोफत होत नव्हते. सुभाष शिरोडकर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा त्यांनी आणि दिगंबर कामत यांनीदेखील त्यावेळच्या विरोधी पक्षाला म्हणजे भाजपला व पर्रीकर यांना घाबरूनच दिवस काढले होते.
अर्थात गिरीश चोडणकर यांना एका गोष्टीचे श्रेय द्यावे लागेल, त्यांनी कधी पर्रीकर यांच्या सत्तेच्या दहशतीची पर्वा केली नाही. काँग्रेसचा झेंडा हाती घेऊन सतत आंदोलने केली होती, मात्र गोव्यात काँग्रेसने कधी पक्ष संघटना नीट बांधली नाही की धड सदस्य नोंदणीही केली नाही. एका विधानसभा निवडणुकीवेळी पणजीत उदय मडकईकर यांना तिकीट नाकारून एल्वीस गोम्स यांना अचानक तिकीट देणे हा काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांचा बालीशपणाच नव्हे तर निव्वळ वेडेपणा होता. काँग्रेसमध्ये असे वेडगळ निर्णय घेणारे नेते कमी नाहीत. कामत यांच्याच काळात काँग्रेस सरकारवर भ्रष्टाचाराचे अधिक आरोप झाले, असेही चोडणकर म्हणतात, २०१२ च्या निवडणुकीत लोकांनी काँग्रेसचा मोठा पराभव केला, तो कामतांमुळेच झाला, असे चोडणकर यांना वाटते, आपण मुख्यमंत्रिपदी होतो तेव्हाही भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या संपर्कात होतो, असे कामतांनी म्हटल्याचे चोडणकर यांनी नमूद केले आहे.
अर्थात त्यावेळी कामत भाजपच्या संपर्कात का असायचे ते कळत नाही. शेवटी आपण देवाच्याही संपर्कात असतो, असादेखील कामत यांचा दावा असतोच म्हणा, त्यामुळे त्याकडे जास्त लक्ष देण्याचे कारण नाही. फक्त गोव्यात काँग्रेस अडचणीत आली ती वेगवेगळ्या नेत्यांमुळे व काँग्रेसच्या व्हिजनशून्य धोरणांमुळे, हे सांगावे लागेल.