पणजी : राहुल गांधी हे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत नसल्याने देशातील अनेक काँग्रेस नेते आपल्या पदांचे राजीनामे देत आहेत. काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनीही प्रदेशाध्यक्षपद आपण सोडत असल्याचे शुक्रवारी येथे जाहीर केले आणि आपले राजीनामा पत्रही दिल्लीला पाठवून दिले.
लोकसभा निवडणुकीत देशभर काँग्रेसचा जो पराभव झाला, त्या पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधी यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सोडले. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी देशभरातील काँग्रेसजनांनी केली पण गांधी राजीनामा मागे घेण्यास तयार नाहीत. गोव्यात लोकसभेच्या दोनपैकी एक जागा काँग्रेसने जिंकली. पूर्वी दोन्ही जागा भाजपकडे होत्या. मात्र यावेळी चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने दक्षिण गोव्यात भाजपचा पराभव केला. फ्रान्सिस सार्दिन निवडून आले. विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये मात्र केवळ एकच पणजीची जागा काँग्रेस पक्ष जिंकला. अर्थात हा वेगळा विषय असला तरी, गोवा प्रदेश काँग्रेसमध्येही या सर्व विषयांवरून चर्चा सुरूच आहे. पराभवानंतर व केंद्रात आणि गोव्यातही सत्ता न आल्याने गोव्यातील काँग्रेसचे काही आमदार हताश झालेले आहेत. मध्यंतरी ते काँग्रेसला सोडचिठ्ठीही देऊ पाहत होते. या सगळ्य़ा पाश्र्वभूमीवर चोडणकर यांच्याही वाटय़ाला अस्वस्थता येत आहे.