खाण पट्ट्यातील बेदरकार ट्रक वाहतुकीने लोकांच्या जीवाशी खेळ- गिरीश चोडणकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 02:37 PM2020-04-30T14:37:02+5:302020-04-30T14:39:41+5:30
गोव्याच्या भाजप सरकारची गोमंतकीयांप्रती असंवेदनशीलता परत एकदा उघड झाली आहे.
मडगाव- गोव्यातील खाण पट्ट्यात सध्या जीवनावश्यक सेवेच्या नांवाखाली कोरोनाचा फैलाव झालेल्या कर्नाटकांतुन येणाऱ्या सुमारे २०० ट्रकांची बेदरकार वाहतुक चालु असुन, त्यामुळे स्थानिक लोकांच्या जीवाला गंभिर धोका निर्माण झाला आहे. बेशिस्त वाहतुकीमूळे भयंकर अपघात होण्याचे संकट उभे ठाकले आहे अशी भिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केली आहे.
संपुर्ण देशात लाॅकडाऊन मुळे आंतरराज्य वाहतुक बंद असताना गोवा सरकारने खनिज ट्रक वाहतुकीला कोणत्या आधारे परवानगी दिली हे स्पष्ट करणे गरजेचे आहे. आपल्या क्रोनी केपिटालीजमचा अजेंडा पुढे नेण्यासाठी मोदी सरकारने खाण व्यवसायाचा जीवनावश्यक सेवामध्ये समावेश केला आहे का हे भाजप सरकारने लोकांना सांगावे असे त्यांनी म्हटले आहे.
स्थानिक खाण अवलंबीतांवर सध्या उपासमारीची पाळी आलेली असताना, गोमंतकीयांचे ट्रक वापरणे सोडुन सरकार आज कर्नाटकांतील ट्रक मालकांना व चालकांना परवानगी देते, यावरुन गोव्याच्या भाजप सरकारची गोमंतकीयांप्रती असंवेदनशीलता परत एकदा उघड झाली आहे. गोवा सरकारला हवे असल्यास गोमंतकीयांचे ट्रक वापरण्याची विनंती ते कर्नाटकातील खाण मालकांकडे करु शकले असते. कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या कर्नाटकातुन येणारे ट्रक ड्रायव्हर, क्लिनर यांची कोरोना चांचणी केली जाते का व त्यांना कोरोना नसल्याचे प्रमाणपत्र कोण देतो हे सरकारने लोकांना सांगणे गरजेचे आहे.
दररोज कर्नाटकांतुन येणाऱ्या ट्रक ड्रायव्हर वा क्लिनरकडुन गोमंतकीयांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास त्याची जबाबदारी सरकारवर राहणार आहे. मुख्यमंत्र्यानी ताबडतोब खाणपट्ट्यात पोलीस व वाहतुक अधिकाऱ्याना पाठवुन बेदरकार वाहतुकीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. लाॅकडाऊन मुळे त्रस्त असलेल्या गोमतकीयांना शुल्लक कारणांसाठी चलन देऊन त्यांची सतावणुक करणाऱ्या पोलीसांची खरी गरज खाण पट्ट्यात आहे. गोवा दीवाळखोरीत काढलेल्या भाजप सरकारने लोकांना चलन देऊन महसुल गोळा करण्याचे नविन धोरण आखले आहे का हे मुख्यमंत्र्यानी सांगावे असे चोडणकर यानी म्हटले आहे.