पणजी - सत्तेसाठी अन्य पक्षांच्या आमदारांमागे धावण्यापेक्षा लोकांना पक्षाकडे आकर्षित करु, ख-याचे राजकारण करुन लोकांची मने जिंकू. आपल्याला रस्त्यावर उतरुन प्रत्यक्ष फील्डवर काम करणारे कार्यकर्ते टीममध्ये हवेत, असे प्रतिपादन गिरीश चोडणकर यांनी शुक्रवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर केले. दुसरीकडे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्यासह काही आमदारांनी मात्र नजीक च्या काळात काँग्रेस सत्ता मिळवू शकतो, अशी सूचक विधाने करताना भाजपने चोरलेली सत्ता काँग्रेस पुन: मिळविल, असा दावा केला.
गिरीश यांचा पदग्रहण सोहळा शुक्रवारी झाला. या प्रसंगी सुभाष शिरोडकर वगळता काँग्रेसचे सर्व आमदार तसेच माजी मुख्यमंत्री, मावळते प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक, पदाधिकारी, काँग्रेसचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार, माजी केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री मिलिंद देवरा, महाराष्ट्रातील पक्षाचे युवा नेते अमित देशमुख, खासदार तथा गुजरातचे काँग्रेस प्रभारी राजीव सतपाल आदी उपस्थित होते. गिरीश यांच्या आई वडिलांनीही या सोहळ्यास उपस्थिती लावली होती. यावेळी केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसेच गिरीश यांना गुलाबांचा मोठा पुष्पहारही घालण्यात आला.
नव्याने सदस्यता मोहीम
काँग्रेससाठी नव्याने सदस्यता मोहीम सुरु करण्याचा संकल्पही गिरीश यांनी जाहीर केला. ते म्हणाले की, ‘पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाईल. मुद्यावर आधारित चळवळी सुरु करुन लोकांपर्यंत जाऊ. चाळ्ीसही मतदारसंघांमध्ये प्रत्येक बूथवर संघटनेचे जाळे उभारु. निवडणुका कधीही होओत त्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज असला पाहिजे अशा पध्दतीने राज्यात पक्षाची बांधणी करीन. यापुढे गटस्तरीय बैठका नित्यनेमाने होतील. पक्षामध्ये शिस्तीच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही. विधानसभा तिकिटासाठी रांगा लागतात तशा रांगा पक्षाचा कार्यकर्ता बनण्यासाठी लागल्या पाहिजेत.’ प्रदेश समितीत युवा आणि ज्येष्ठ असे दोन्ही प्रकारचे पदाधिकारी असतील परंतु प्रत्येकाने प्रत्यक्ष रस्त्यावर उतरायला हवे.’काँग्रेस खºयाचे राजकारण करील, लोकांपर्यंत जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभेआधी गोड बातमी : कवळेकर
बाबू कवळेकर म्हणाले की, भाजपने मागील दाराने सत्ता हिसकावून घेतली. आगामी लोकसभेसाठी दोन्ही जागा काँग्रेस जिंकणार आहे परंतु त्याआधीही कार्यकर्त्यांना गोड बातमी मिळू शकते, असे सूचक विधान त्यांनी केली. काँग्रेसचे सर्व आमदार संघटित आहेत आणि गिरीश यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रतापसिंह राणे म्हणाले की, कुठलेच पद कायम नसते. पाणी टंचाईसारखे लोकांचे विषय गिरीश यांनी घ्यावेत. लोकांना विषय हाताळावेत. चेल्लाकुमार म्हणाले की, भाजपने गोव्याला खास दर्जाचे आश्वासन दिलेले आश्वासन पाळले नाही. गोव्यात खाणी पूर्ववत चालू व्हाव्यात अशी काँग्रेसची भूमिका आहे. प्रादेशिक आराखड्याच्या बाबतीत पक्ष लोकांबरोबर राहील. लुइझिन फालेरो यांनी खाणबंदी, प्रादेशिक आराखडा यासारखे अनेक ज्वलंत विषय आज आहेत, असे नमूद केले. भाजपने चोरलेली सत्ता काँग्रेस परत मिळविल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दिगंबर कामत यांनी गिरीश यांची निवड हा योग्य निर्णय आहे. त्यांनी तळागाळात काम केले असून अनुभवाच्या जोरावर गिरीश पक्ष पुढे नेऊ शकतील.
शांताराम म्हणाले की, ज्या तीन निकषांची मी मागणी केली होती ते तिन्ही निकष गिरीश यांच्या निवडीने पूर्ण झाले आहेत. लोकसभेबरोबर गोव्यात विधानसभा निवडणुका झाल्या तरी त्याला आम्ही तयार आहोत. वारसा स्थळ दत्तक प्रकरणात त्यानी भाजपवर टीका केली.
मिलिंद देवरा म्हणाले की, भाजपने सत्ता चोरली आहे ती परत मिळविण्याचे काम आता काँग्रेसला करावे लागेल. अमित देशमुख म्हणाले की, गोव्यात लोकांनी काँग्रेसवर विश्वास दाखवून जनमत दिले होते. परंतु कट कारस्थान करुन भाजपने ते हिसकावून घेतले. आता लोकसभेसाठी तयार रहा.
रवी नाईक यांनी सरकारच्या सर्व योजना कोलमडल्या असल्याची टीका केली. रेजिनाल्द लॉरेन्स, नीळकंठ हळर्णकर, रमाकांत खलप, महिला मोर्चा अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो आदींचीही भाषणे झाली.