पणजी : आठ फुटीर काँग्रेसी आमदारांविरुध्दच्या अपात्रता याचिकेवर सुनावणी घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर हे सभापतींविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका सादर करण्याच्या तयारीत आहेत.
चोडणकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने केशाम मेघाचंद्र सिंह प्रकरणात तीन महिन्यात सभापतींनी अपात्रता याचिका निकालात काढायला हवी, असे स्पष्ट आदेश दिले असतानाही सभापती रमेश तवडकर हे आठ फुटीर काँग्रेसी आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिकेवर सुनावणी घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा हा अवमान ठरतो आणि त्यासाठीच मी अवमान याचिका सादर करण्याच्या तयारीत आहे.'
सभापती तवडकर हे याबाबतीत टाळाटाळ करून सर्वोच्च न्यायालयाचा अनादर करत आहेत. भाजपने लोकशाही पायदळी तुडवून सत्ता हडपण्याचे सत्र आरंभले आहे. इतर पक्षांचे आमदार पळवणे एवढेच या पक्षाचे काम आहे. अपात्रता याचिका प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील माझ्या आव्हान याचिकेवर न्यायालयाने सभापती तसेच आठही फुटीर आमदारांना नोटिसा बजावून लोकशाही वाचवण्यासाठी आशेचा किरण दाखवला आहे, असे चोडणकर यांनी पुढे म्हटले आहे.
याबाबतची पार्श्वभूमी अशी की, १४ सप्टेंबर २०२२ रोजी दिगंबर कामत, मायकल लोबो, रुडॉल्फ फर्नांडिस, राजेश फळदेसाई, डिलायला लोबो, संकल्प आमोणकर, केदार नाईक व आलेक्स सिक्वेरा हे आठ आमदार काँग्रेसमधून फुटले आणि त्यांनी विधिमंडळ पक्षच भाजपमध्ये विलीन केला. हे विलीनीकरण घटनाबाह्य असल्याचा दावा करून गिरीश यांनी अपात्रता याचिका सादर केलेली आहे.