लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: बहुजन समाज हा भाजप सोबत नाही. भाजपने उलट या समाजाला तसेच त्यांच्या नेतृत्वाला चिरडण्याचे काम केले आहे. त्यामुळेच हा समाज काँग्रेससोबत असल्याचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट केले.
पणजी येथील लोकमत कार्यालयालस काल, बुधवारी त्यांनी भेट दिली. यावेळी आयोजित वार्तालापावेळी ते बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण गोव्यातून आपणाला तिकिट मिळावी, अशी आपली इच्छा आहे. मात्र, याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचे आमदार पक्षांतर करीत असल्याने काँग्रेसवरील विश्वासाबाबत लोकांच्या मनाला तडे गेले आहेत. मात्र याचा अर्थ लोक आमच्या सोबत नाही, असा होत नाही. कारण पक्षांतर आमदारांनी केले, त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाही. बहुजन समाज हा भाजप सोबत नाही, तो काँग्रेससोबत आहे. निवडणुकीत त्याचा नक्की फायदा होईल. भाजपने बहुजन समाजाला चिरडण्याचे काम केले असून हे वेळावेळी दिसून आले आहे. केंद्रात व राज्यात भाजप सरकार असूनही एसटी समाजाला राजकीय आरक्षण दिलेले नाही, अशी टीकाही चोडणकर यांनी केली.
काँग्रेसने आपल्याकडे चार राज्यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी दिली आहे. मात्र तरीही आपण लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. दक्षिण गोव्याची तिकीट आपल्याला द्यावी. तसे झाले तर पक्षाला तिथे जिंकण्याची संधी आहे. अन्यथा आपण मिळालेली जबाबदारी आहे, तशी सांभाळू व पक्षाचे कार्य सुरूच ठेवणार, असे दोन पर्याय आपण दिल्याचे चोडणकर म्हणाले.
दक्षिण गोव्यात काँग्रेसचे बूथ पातळीवर काम सुरू आहे. त्यात विद्यमान सरकारच्या ध्येय, धोरणांना जनता कंटाळली आहे. महागाई, बेरोजगारी, आर्थिक नियोजनात उदासिनता दिसून येत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्याचा काँग्रेसला नक्कीचा लाभ होणार असल्याचा दावा गिरीश चोडणकर यांनी केला.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काँग्रेससह अन्य घटकांची इंडिया आघाडी आपल्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचे नाव ठरवेल. पंतप्रधान कोण असावा, हा निर्णय संबंधित पक्षाचे खासदार घेतात, असे चोडणकर म्हणाले. केंद्र सरकारने महिलांना ३३ टक्के आरक्षण जारी केले आहे. गोव्यात मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. गोवा सरकारच्या मंत्रिमंडळात तीन महिला आमदार आहेत. मात्र, त्यापैकी एकीलाही मंत्रिपद नाही, असेही चोडणकर म्हणाले.
'आरजी'चे काम झाले, आता पक्ष विसर्जित करावा
रिव्होल्यूशनरी गोवन्स अर्थात आरजी पक्ष आता विसर्जित करावा. कारण ज्या उद्दिष्टासाठी हा पक्ष स्थापन केला होता तो आता राहिला नाही. पोगो बिल मंजूर करून घेण्यासाठी जो प्रयत्न हवा होता, तो झाला नाही. आरजीने केवळ काँग्रेसची मते फोडण्याचे काम केले. काँग्रेसची मते फोडणे व भाजपची मदत करणे हाच त्यांचा प्रमुख अजेंडा आहे. पोगो बिलाच्या नावाने ते गोमंतकीयांना ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप चोडणकर यांनी केला. गत विधानसभा निवडणुकीत आरजीने काँग्रेसची मते फोडल्यानेच अनेक उमेदवारांना अवघ्या मतांनी पराभव पत्कारावा लागला. आता ते काँग्रेसने पाठींबा देण्याची भाषा करत असून निवडून आलेले दोन्ही उमेदवार इंडिया आघाडीला साथ देतील, असे परब यांचे विधान हस्यास्पद आहे. आरजी हा भाजपाचा घटक असल्याची टीका चोडणकर यांनी केली.
मगोने परंपरा पाळावी
लोकसभा निवडणुकीत जर दोन्ही जागा भाजपला गेल्या तर राजकीयदृष्ट्या पूर्ण गोवा भाजपमय होण्याची भीती आहे. परंपरेप्रमाणे लोकसभा निवडणुकीत मगोने काँग्रेसला पाठिंबा द्यावा. भाजप केवळ मतांसाठी हिदुत्वाचा मुद्दा पुढे करीत आहेत. मागील काही वर्षात विश्वजित राणे धरून भाजपने काँग्रेसचे सुमारे २० ते २५ प्रमुख नेते आपल्या सोबत नेले. आमदार गेले म्हणून काँग्रेसच्या मताधिक्क्यावर मोठा परिणाम जाणवला नाही, असेही चोडणकर यांनी स्पष्ट केले.