गिरीश चोडणकरांचा राजीनामा स्वीकारला की नाकारला; कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 01:48 PM2020-12-23T13:48:57+5:302020-12-23T13:49:53+5:30
प्रदेशाध्यक्ष पद मिळविण्यासाठी काँग्रेसमध्ये स्पर्धा
पणजी : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा गिरीश चोडणकर यांनी दिलेला राजीनामा स्वीकारला की नाकारला गेला याविषयी राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. प्रदेशाध्यक्ष पद मिळविण्यासाठी काँग्रेसमध्ये स्पर्धा असताना प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी अजून संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केलेला नाही.
काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश राव मंगळवारी उत्तर गोव्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना व पराभूत झेडपी उमेदवारांना भेटले. काँग्रेसचा पराभव का झाला हे त्यांनी जाणून घेतले. काँग्रेसच्या आमदारांनी, नेत्यांनी निवडणूक प्रक्रियेत अधिक भाग घ्यायला हवा हेही दिनेश राव यांनी मांडले.
दिनेश गुंडू राव हे आज बुधवारी सायंकाळी मडगावला काँग्रेस कार्यालयाला भेट देतील. त्यांनी आमदार, प्रमुख नेते, प्रमुख कार्यकर्ते यांना भेटणे सुरूच ठेवले आहे. दिगंबर कामत व गिरीश चोडणकर हेही राव यांच्यासोबत असतात. चोडणकर यांचा राजीनामा स्वीकारला की नाकारला हे अजून चोडणकर यांच्या काँग्रेसमधील समर्थकांना व विरोधकांनाही कळालेले नाही.
पत्रकारांनी राव यांना विचारले असता, राजीनाम्याविषयी पक्षश्रेष्ठीच काय तो निर्णय घेतील असे त्यांनी मंगळवारी दुपारी सांगितले.
खासदार फ्रान्सिस सार्दिन, आमदार लुईझिन फालेरो, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे चोडणकर यांच्या नेतृत्वाविरुद्ध आहेत. जिल्हा पंचायत निवडणुकीत नेत्यांना काही जबाबदारीच दिली गेली नव्हती अशी नेत्यांची भावना आहे. संकल्प आमोणकर वगैरे काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्षपद मिळविण्यासाठी गेल्या काही दिवसांत जोरदार प्रयत्न केले. आमोणकर यांनी काँग्रेसजनांची एक बैठकही घेतली व आम्ही सगळे युवा कार्यकर्ते काँग्रेसचे काम पुढे नेणार असा निर्धारही त्यांनी जाहीर केला होता. मात्र चोडणकर यांचा राजीनामा स्वीकारला गेला की नाकारला गेला ते आमोणकर यांनाही ठाऊक नाही. काँग्रेसची महिला शाखा, युवा शाखा वगैरे याविषयी अंधारात आहे. गिरीशच्या समर्थकांच्या मते मात्र राजीनामा अजून स्वीकारला गेलेला नाही. तो फेटाळला गेला असे देखील सांगितले गेलेले नाही. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ आमदाराच्या मते राजीनाम्याविषयी काय निर्णय घ्यावा ते दिनेश राव यांच्या हाती नाही. ते पक्षश्रेष्ठीच ठरवतील. दिनेश राव हे पक्षश्रेष्ठींना त्यांचा अहवाल सादर करतील. त्यामुळेच ते काँग्रेसजनांची बाजू ऐकून घेण्यासाठी गोव्यात आले आहेत. विरोधी पक्षनेते कामत यांचे व चोडणकर यांचे संबंध चांगले आहेत. सार्दिन किंवा फालेरो किंवा अन्य कुणी प्रदेशाध्यक्षपदी आलेले कामत यांना नको असल्याचे पक्ष सुत्रांनी सांगितले.