पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणून गिरीश चोडणकर यानाच संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. सध्या चोडणकर यांच्यासाठी पक्षाचे केंद्रीय निरीक्षक चेल्लाकुमार हेही प्रयत्नशील आहेत. त्यामुळे काही आमदारांचा आक्षेप असला तरी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे चोडणकर यांच्याच नावाला पसंती देतील अशा प्रकारची चर्चा काँग्रेसच्या आतिल वतुर्ळातही सुरू झाली आहे.काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्या मनात अचानक प्रदेशाध्यक्ष बनण्याची इच्छा निर्माण झाली आहे. ते त्यासाठी लॉबिंग करत आहेत. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना देखील काँग्रेसने जर प्रदेशाध्यक्षपद दिले तर त्यांना आता ते हवे आहे, असे सूत्रांनी सांगितले.काँग्रेस पक्ष संघटना चोडणकर यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविण्याच्या बाजूने आहे पण काही आमदार त्यासाठी तयार नाहीत. अर्थात राहुल गांधी यांनी एकदा निर्णय घेतला तर मग आमदारांचीही डाळ शिजू शकणार नाही. चोडणकर जर प्रदेशाध्यक्ष झाले तर गोवा फॉरवर्ड पक्ष आमच्यासोबत सरकार स्थापनेसाठी येणार नाही अशा चुकीच्या भ्रमात गेले वर्षभर काँग्रेसचे काही आमदार वावरत आहेत. लुईङिान फालेरो यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोडले तर राज्यात लगेच काँग्रेसचे सरकार अधिकारावर येईल असे चित्र पक्षाच्या काही आमदारांनी गेल्यावर्षी बाबूश मोन्सेरातच्या आधारावर उभे केले होते पण फालेरो यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले तरी, काँग्रेसचे सरकार काही आले नाही. उलट मोन्सेरात यांचा ग्रेटर पीडीएचे चेअरमन म्हणून राज्याभिषेक झाला. आता शांताराम नाईक यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन चोवीस तास उलटले. भाजपप्रणित आघाडी सरकारमधील कुठलाच पक्ष गेल्या चोवीस तासांत काँग्रेसकडे सरकार स्थापनेसाठी आला नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष कोण होतात यावर सरकार घडणो किंवा न घडणो हे अवलंबून नाही अशी चर्चा काँग्रेसशी अनेक वर्षे निष्ठावान असलेल्या पक्षाच्या कार्यकत्र्यामध्ये सुरू आहे.काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी येणारा नेता हा भाजप सरकारला शिंगावर घेणारा असावा, सर्व प्रकारचे गैरकारभार चव्हाटय़ावर आणणारा असावा असे राहुल गांधी यांना अपेक्षित असल्याचे चेल्लाकुमार यांनी काँग्रेसच्या काही आमदारांना सांगितले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत चेल्लाकुमार गोव्यात दाखल होणार आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी गिरीश चोडणकर यांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 10:15 PM