पणजी : प्रत्येक काळात युवक किंवा विद्यार्थ्यांचा एक छोटा गट असा असतो, जो नको त्या गैरप्रकारांमध्ये रस घेत असतो. काही विद्यार्थी पॉर्न फोटो पाहण्यात रस घेतात तर काही युवक ड्रग्जकडे आकर्षित होतात. मात्र मुली देखील बिअर पिऊ लागल्या आहेत हे पाहून भीती वाटते अशा प्रकारची प्रतिक्रिया मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केली.
सरकारच्या विधिमंडळ खात्याकडून येथील गोमंतक मराठा समाजाच्या सभागृहात युवा संसद शुक्रवारी पार पडली. त्यावेळी शेकडो विद्यार्थ्यांसमोर विद्यार्थ्यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम ठेवला गेला होता. मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीवेळी विविध मुद्दे मांडले. तसेच त्यांना काही सल्लेही दिले आणि पूर्वीचे विद्यार्थी जीवन व आताचे स्टुडंट लाईफ याचाही धावता आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या काही प्रश्नांनाही मुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली व मुलाखतीत रंग भरला.
ड्रग्ज व्यवसायासंबंधी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की गोव्यातील महाविद्यालयांमध्येही अंमली पदार्थ पोहचले असे सर्रास बोलले जाते. मात्र महाविद्यालयांमध्ये ड्रग्जचा मोठय़ा प्रमाणात फैलाव झाला आहे असे मला तरी व्यक्तीश: वाटत नाही. हे विद्यार्थीच त्याविषयी जास्त सांगू शकतील. सरकार ड्रग्ज प्रकरणी कडक कारवाई करत आहेच. शैक्षणिक संस्थांमध्ये ड्रग्ज पसरू नये म्हणूनही कारवाई केली जात आहे. प्रत्येक काळात काही विद्यार्थी हे नको त्या गोष्टीत जास्त रस घेत असतात. सगळीकडेच तसे चित्र असते. खरे म्हणजे मुलीही बिअर पितात ही मला भीतीची व चिंतेची गोष्ट वाटते. मी हे विधान इथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांविषयी करत नाही. कारण सगळ्य़ाच मुली बिअर पित नाहीत.
मुख्यमंत्री म्हणाले, की आपण अकरा-बारा वर्षाचा होतो तेव्हा काही विद्यार्थी पोर्न फोटो पाहत होते. मी जेव्हा आयआयटीमध्ये उच्च शिक्षणासाठी गेलो तेव्हा मुंबईतही विद्यार्थ्यांचा एक छोटा गट गैरप्रकार करायचाच. गोव्यातील ड्रग्जसंबंधी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की ड्रग्जविरोधात व्यापक कारवाईचे आदेश आपण गेल्या ऑगस्ट महिन्यात दिले होते. त्यानंतर आतार्पयत 170 पेक्षा जास्त व्यक्तींना ड्रग्ज व्यवहारांबाबत अटक झाली. आठ दिवस ते एक महिना तुरुंगात राहिल्यानंतर अशा व्यक्तींची सुटका होते. कायद्यात तशी तरतुद आहे. सरकारने अंमली पदार्थाशी निगडीत नेटवर्किगविरुद्धही जोरदार कारवाई केली आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहील. ड्रग्जचे प्रमाण शून्यावर येऊ शकणार नाही पण ड्रग्ज डोळ्य़ांसमोरून निश्चितच नाहीसे होतील.