लोकमत न्यूज नेटवर्क फोडा : देशात मुलींवर होणारे अत्याचार ही अत्यंत चिंतनीय बाब असून, त्या दृष्टीने कुटुंबीयांनी दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. मुलींनीही शारीरिक, मानसिकदृष्ट्या कणखर बनून, अशा अपप्रवृत्तींचा प्रतिकार करायला शिकले पाहिजे, असे मत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.
चतुरंग प्रतिष्ठानने फर्मागुडी येथील पीईएस महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. 'चला आता तुमची पाळी' हा व्याख्यानाचा विषय होता. व्यासपीठावर पीईएस संस्थेचे खजिनदार प्रकाश बाळवे, उपप्राचार्य डॉ. सतीश केळुस्कर, चतुरंग प्रतिष्ठानच्या सदस्य दीपा मिरींगकर व मराठी विभाग प्रमुख प्रा. दीपक छत्रे उपस्थित होते. जीवन समृद्ध बनविणाऱ्या अनेक कक्षा निर्माण झाल्या आहेत. करिअरसाठी अनेक पर्याय असले, तरी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करण्यावर भर द्यावा. आदर्शवत जीवन जगणार असाल, तर एखाद्या महापुरुषाचे चरित्र जाणून घेत, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनाची वाटचाल करावी, असे पोंक्षे यांनी सांगितले.
यावेळी पोंक्षे यांनी राष्ट्रगीताचा अर्थ विशद करून भारतीय संस्कृतीचे महत्त्व सांगितले. दीपक छत्रे यांनी स्वागत, तर डॉ. केळुस्कर यांनी प्रास्ताविक केले. दीपा मिरींगकर यांनी चतुरंग प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. इतर मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कला शाखेच्या विद्यार्थिनी सोनम मालवणकर यांनी रेखाटलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे रेखा चित्र शरद पोंक्षे यांना डॉ. केळुस्कर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन शेफाली दळवी यांनी केले. चतुरंग प्रतिष्ठानच्या सदस्य विद्या टेंगसे यांनी आभार मानले.