लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : अल्पवयीन मुलीला अक्कलकोट येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या कोल्हापूरच्या युवकाने अक्कलकोट येथे जाऊन बलात्कार नव्हे तर लग्न केल्याची साक्ष मुलीने न्यायालयात दिली. त्यामुळे पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने या युवकाची निर्दोष मुक्तता केली. अंकुर धनके (रा. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.
२८ जानेवारी २०२२ रोजी पेडे म्हापसा येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला अक्कलकोट येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी कोल्हापूर येथील अंकुर धनके याच्याविरुद्ध म्हापसा पोलिस स्थानकात केली होती. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून घेऊन न्यायालयात खटला दाखल केला होता. या प्रकरणी सुनावणीदरम्यान झालेल्या युक्तिवादात मुलीला मुलगा घेऊन गेला होता, तेव्हा ती अल्पवयीन असल्याचे सिद्ध करण्यास पोलिसांना अपयश आले. तसेच मुलीने दिलेली साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. अंकुरने आपले अपहरण केले नव्हते, असे या मुलीने सांगितले. तसेच बलात्कारही केला नसल्याचे सांगितले. अक्कलकोट येथे दोघांनी लग्न केले, अशी साक्ष तिने दिल्यामुळे अंकुरच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला.
न्यायाधीश शबनम शेख यांनी आरोपीला निर्दोष मुक्त केले. या खटल्यात अंकुर याच्यावतीने अॅड. अमरनाथ देसाई यांनी युक्तिवाद केले. तर सरकारी वकील म्हणून नीता मराठे यांनी बाजू मांडली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"