पणजी : संजीवनी कारखान्याला दर वर्षी सहा कोटी रुपयांचे नुकसान झेलावे लागते त्यामुळे संजीवनीला नवसंजीवनी देण्याची गरज आहे. खाद्य उद्योगासाठी उपलब्ध होणाऱ्या निधीतून ७५ लाख रुपये संजीवनीसाठी वापरण्यात यावा, असा विचार उद्योगमंत्री महादेव नाईक यांनी व्यक्त केला. सहकार खात्यातर्फे बुधवारी तेथे आयोजित ‘गोवा राज्य सहकारी पुरस्कार २०११-१२ व २०१२-१३’ या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. या वेळी व्यासपीठावर लोकसभा संसद सदस्य नरेंद्र सावईकर, सहकार खात्याचे सचिव फैजी ओ हश्मी, उच्च शिक्षण संचालक भास्कर नायक, सुभाष फळदेसाई, संचालक नारायण सावंत उपस्थित होते. नाईक म्हणाले की संजीवनी मिनरल वॉटर प्रकल्प सुरू केल्यास संजीवनी कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना आर्थिकदृष्ट्या साहाय्य मिळेल. फोंडा येथील सहकार भवनाच्या उद्घाटनानंतर त्याठिकाणी प्रशिक्षण देण्याचे काम केले जाईल. सहकारी क्षेत्रात तरुणांनी पुढाकार घ्यावा यासाठी सिस्टममध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. या वेळी भास्कर नायक म्हणाले की, सहकाराच्या माध्यमातून प्रगती शक्य आहे. शेजारील राज्यातील सहकारी संस्था पाहता गोव्यातील संस्था फार उत्तम आहे. सहकार माध्यमातून एकत्र येऊन साळावली धरणाचे पाणी संजीवनीसाठी वापरता येईल काय यावर विचार होणे आवश्यक आहे. या वेळी रामकृष्ण डांगी यांना सहकार भूषण पुरस्कार देण्यात आला. रोहिदास नाईक यांना २०११-२०१२ चा शंकर श्री पुरस्कार देण्यात आला. २०११-१२ वर्षातील उत्कृष्ट संस्थेसाठी कुर्डी येथील वी.के.के.एस. सोसायटीला पुरस्कार देण्यात आला. डिचोली येथील दीनदयाळ नागरी सहकारी पथ संस्था मर्यादित व फोंडा येथील जी. व्ही. एम. स्टाफ को-ैआॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांना उत्कृष्ट संस्थेचा उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला. वर्षा मराठे, श्रीपाद ताम्हणकर यांना २०११-१२चा वैयक्तिक साहाय्यक पुरस्कार देण्यात आला. २०१२-१३ चा गोवा सहकार रत्न पुरस्कार मिलिंद केरकर यांना देण्यात आला, तर गोवा सहकार भूषण हा पुरस्कार प्रकाश शंकर वेळीप यांना देण्यात आला. २०१२-१३ चा सहकार श्री पुरस्कार किसन फडते, तुळशिदास मळकर्णेकर यांना देण्यात आला. आरोय सेवा संचालनालय सर्व्हिस अॅप्लोयी क्रेडिट सोसायटी लिमिटेड व धारबांदोडा वी.के.एस. सोसायटी लिमिटेड यांना २०१२-१३ चा उत्कृष्ट संस्थेचा उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला. रामकृष्ण गावकर यांना वैयक्तिक साहाय्यक व सुमन भोसले यांना ‘असिस्टंट टू इंडिविजल’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)
खाद्य उद्योगासाठीचे ७५ लाख संजीवनीला देणार
By admin | Published: February 19, 2015 2:24 AM