लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: आठ फुटीर काँग्रेस आमदारांबरोबरच बाबू कवळेकर व इतरांसाठी ही लोकसभा निवडणूक कसोटीची असून, तशी ती विधानसभेची सेमिफायनलच ठरणार आहे. आपापल्या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला लीड दिली तरच २०२७च्या निवडणुकीत पक्षाकडून आमदारकीचे तिकीट मिळू शकेल अन्यथा नाही, अशी चर्चा आहे.
सप्टेंबर २०२२ मध्ये दिगंबर कामत, मायकल लोबो, डिलायला लोबो, संकल्प आमोणकर, आलेक्स सिक्वेरा, केदार नाईक, रुडॉल्फ फर्नांडिस व राजेश फळदेसाई हे आठ काँग्रेसचे आमदार फुटले व भाजपवासी बनले.
आता सर्वजण कामाला लागले आहेत. दिगंबर कामत हे पल्लवी यांच्या प्रचारासाठी मडगावमध्ये जाहीर सभांचे फड गाजवत आहेत. लोबो दाम्पत्य, केदार, रुडॉल्फ हेही जोमाने काम करत आहेत. नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांना तर भाजपने मंत्रिपद दिल्याने सासष्टीत काँग्रेसची मते भाजपकडे वळवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. येत्या ४ जूनरोजी कोणी किती काम केले व काँग्रेसची किती मते भाजपकडे वळवली, हे स्पष्ट होणार आहे.
विधानसभा निवडणुकीला अजून तीन वर्षे आहेत. शेवटच्या सहा महिन्यांत आमदारांचा पफॉर्मन्सही महत्त्वाचा ठरणार आहे. पक्षाचे आमदारांच्या कामगिरीवर लक्ष आहे. त्यामुळे पुन्हा तिकीट हवे असल्यास संख्याबळ सिद्ध करावेच लागेल, असे तानावडे म्हणाले.
बाबू कवळेकर हे काही आमदार नाहीत. परंतु ते दक्षिण गोव्यात यावेळी लोकसभेच्या तिकिटासाठी प्रबळ दावेदार होते. भाजप श्रेष्ठींनी अखेरच्या क्षणी महिला उमेदवार देण्याचा निर्णय घेतला व कवळेकर यांचा पत्ता कापला.
परफॉर्मन्सवरच भवितव्य : तानावडे
भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना विचारले असता ते म्हणाले की, निश्चितच आमच्याकडे आलेल्या काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघात भाजपची मते वाढली तर ही मते त्यांनीच आणली, असे मानण्यास हरकत नाही. माझ्यापेक्षा त्यांना जास्त काळजी असणार. कारण, या निवडणुकीतील पफॉर्मन्सवरच त्यांचे पुढील विधानसभा निवडणुकीतील भवितव्य ठरणार आहे.