लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे संभाव्य उमेदवार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याविरोधात रिंगणात उतरण्यासाठी काँग्रेसकडून दोन नावे निश्चित करणारा ठराव मंजूर केला आहे. यात माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप तसेच सरचिटणीस विजय भिके यांचा समावेश आहे. मात्र, यावेळी आयात उमेदवारास उमेदवारीला विरोध करण्यात आला.
सोमवारी म्हापशातील पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेसच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच निष्ठावंत कार्यकर्त्यालाच तसेच पदाधिकाऱ्यांना मान्य असलेल्या उमेदवारालाच उमेदवारी देण्यात यावी आयात उमेदवारास उमेदवारी देण्यात येऊ नये, असाही निर्णय बैठकीत झाला. त्यामुळे माजी आमदार नरेश सावळ यांच्यासोबत युतीतून उमेदवारीसाठी दावा करणाच्या तयारीत असलेल्या दावेदारांच्या दाव्यावर पाणी पडले आहे.
पक्षाच्या वरिष्ठांनी उमेदवाराच्या नावावर लवकरात लवकर शिक्कामोर्तब करून त्याचे नाव जाहीर करण्यात यावे, असेही ठरवण्यात आले. निश्चित करण्यात आलेल्या या दोन नावाची शिफारस प्रदेश काँग्रेसकडे केली जाणार असून तेथून पुढील निर्णयासाठी नावाची शिफारस दिल्ली पक्ष पातळीवर केली जाणार आहे.