पणजी : गोव्यात पूर्णवेळ आणि कार्यक्षम सरकार असावे यासाठी येथील नागरिकांनी एकत्र येऊन सह्यांची मोहीम चालवली आहे. सह्यांचे हे निवेदन लवकरच राज्यपाल मृदुला सिन्हा यांना सादर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गेले काही महिने आजारी आहेत. सध्या ते दिल्ली येथील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे राज्यात प्रशासन कोलमडले आहे, असा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे तसेच कोणतीही कामे होत नाहीत, अशी लोकांची भावना आहे.
या पार्श्वभूमीवर जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन सह्यांची ही मोहीम चालवली आहे. 'कन्सर्न्ड एण्ड कनसायन्शियस सिटिझन्स ऑफ गोवा' या बॅनरखाली हे जागरूक नागरिक एकत्र आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याविषयी संपूर्ण माहिती सरकारने जनतेसाठी जाहीर करावी अशी मागणी या जागरूक नागरिकांनी केली आहे. पर्रीकर यांनी मंत्रिमंडळातील दोन आजारी मंत्र्यांना काढून टाकले परंतु त्याने प्रश्न मिटलेला नाही.
मुख्यमंत्री स्वतः आजारी आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी नागरिकांची मागणी आहे. मुख्यमंत्री तंदुरुस्त असल्याचा दावा केला जात असला तरी तो दिशाभूलकारक असू शकतो, असे या नागरिकांचे म्हणणे आहे त्यामुळे त्यांना नेमका कोणता आजार आहे हे सरकारने उघड करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पर्रीकर यांच्या आजारपणामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन दिवसात गुंडाळण्यात आले आणि आता सरकार कर्जरोख्यांवर खुल्या बाजारातून कर्ज उचलत आहेत. सत्तास्थापनेसाठी घोडेबाजार किंवा घाऊक पक्षांतर एकही शकतात त्यामुळे विधानसभा विसर्जित करणे हाच एकमेव पर्याय या घडीला असल्याचेही त्या जागृक नागरिकांचे म्हणणे आहे.