गोव्याला पूर्णवेळ सीएम द्या, बहुमत सिद्ध करा; काँग्रेसची दिल्लीत मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 08:23 PM2018-10-13T20:23:33+5:302018-10-13T20:25:01+5:30
काँग्रेस आक्रमक झाल्याने भाजपाच्या अडचणी वाढण्याची शक्यता
पणजी : गोव्याला पूर्णवेळ मुख्यमंत्री दिला जावा तसेच भाजपाप्रणीत आघाडीने गोवा विधानसभेत बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी काँग्रेसचे केंद्रीय नेते पवन खेरा आणि प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. भाजपाने बहुमत नसताना सरकार स्थापन करून प्रथम लोकशाहीचा खून केला व आता गोव्याच्या प्रशासनाचा गळा आवळला जात आहे, अशी टीका खेरा यांनी केली.
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गेले नऊ महिने विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्यावर भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी कामाचा आणखी बोजा टाकू नये. त्यांना आजारातून पूर्ण बरे होऊन पुन्हा येऊ द्यावे, असे पवन खेरा म्हणाले. गोवा राज्य सध्या मोठ्या संकटातून जात आहे. घटनात्मक पेचप्रसंग आहे. गोव्यातील मंत्र्यांची बैठक मुख्यमंत्र्यांना दिल्लीतील रुग्णालयात घ्यावी लागते. गोव्यात यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. सरकारला पूर्ण वेळ मुख्यमंत्री नसल्याने सरकारच्या प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली जेव्हा आजारी होते व रुग्णालयात उपचार घेत होते, तेव्हा त्यांच्या खात्याची जबाबदारी पीयूष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आली होती. संसदीय परंपरा अशीच आहे. पण रुग्णालयात असलेले मुख्यमंत्री पर्रिकर यांनाच मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवले गेले आहे, असे खेरा व चोडणकर म्हणाले.
राजकीय संकटात सापडलेल्या गोव्याच्या जनतेला न्याय हवा आहे. जनतेची होरपळ सुरू आहे. पण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गोमंतकीय जनतेच्या हिताशी काहीच देणेघेणे राहिलेले नाही. भाजपमधील स्थितीवर मायकल लोबो या आमदाराने नुकतेच प्रभावी भाष्य केले आहे. अमित शहा यांनी पर्रिकर यांच्या आरोग्याचा व गोव्यातील जनतेच्याही स्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. मुळात भाजपाला किंवा पर्रिकरांना बहुमत देऊन गोव्याच्या जनतेने खुर्चीवर बसवलेले नाही, असे खेरा म्हणाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनीही भाजपकडे तूर्त बहुमत नाही असे नुकतेच म्हटलेले आहे, याची आठवण खेरा यांनी करुन दिली.
भाजपासोबत सत्तेत असलेल्या मगो पक्षानेदेखील मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता ताबा आता द्यायला हवा असे नुकतेच जाहीरपणे सांगितले आहे. जर पांडुरंग मडकईकर व फ्रान्सिस डिसोझा यांना आरोग्याच्या कारणास्तव हटवले जाते, तर मग पर्रिकर यांना का नाही? पर्रिकर यांच्या आरोग्यावर अमित शहा एवढा बोजा का टाकत आहेत? असे प्रश्न पवनखेरा यांनी उपस्थित केले. पर्रिकर यांना विश्रांतीची गरज आहे. गोव्याच्या राज्यपालांनी विधानसभा अधिवेशन बोलवावे. कुणाकडे बहुमत आहे ते तिथे कळून येईल. राजकीय संकटात सापडलेल्या गोव्यातील जनतेला न्याय हवा आहे, असे खेरा व चोडणकर यांनी म्हटले.