पणजी : राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणासाठी जमिनी देणाऱ्या पेडणे मतदारसंघातील लोकांना ताबडतोब भरपाई न दिल्यास स्थानिक काम बंद पाडतील, असा इशारा गोव्याचे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी दिला आहे. स्थानिकांनी विस्तारीकरणाचं काम बंद पाडल्यास त्याला आपला पूर्ण पाठिंबा असेल, असंदेखील आजगावकर म्हणाले. महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी जमीन देणाऱ्यांना पुरेशी भरपाई दिली जावी, यासाठी तोरसेचे सरपंच बबन डिसोझा, तांबोसे-मोपा-उगवेंच्या पल्लवी राऊळ, पोरस्कडेचे रोश फर्नांडिस, विर्नोडाचे भरत गावडे, धारगळचे वल्लभ वराडकर, वारखंड-नागझरचे प्रदीप कांबळी यांनी पर्यटनमंत्री आजगावकर यांची भेट घेतली. यावेळी महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता विजयकुमार वेरेंकर, ज्येष्ठ भूसंपादन अधिकारी सुवर्ण शिंगणापूरकर, अधीक्षक अभियंता राजन कामत, कार्यकारी अभियंता मयेकर उपस्थित होते. स्थानिकांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न विनाविलंब निकालात काढण्याचे निर्देश यावेळी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. जमीन गेलेल्या सर्वांना समान भरपाई मिळायला हवी, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. योग्य त्या नुकसान भरपाईची मागणी मान्य न झाल्यास महामार्ग रुंदीकरणाचे काम बंद पाडण्याचा इशारा याआधीच स्थानिकांनी दिला आहे.
...अन्यथा महामार्ग विस्तारीकरणाचं काम बंद पाडू; गोव्यात पर्यटनमंत्री आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 9:37 PM