लोकसभा उमेदवार लवकर द्या; काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी बैठकीत प्रभारी टागोरांकडे आग्रही मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 08:57 AM2023-07-07T08:57:57+5:302023-07-07T08:58:52+5:30
या मॅरेथॉन बैठकीत काहीजणांनी प्रदेशाध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: लोकसभेसाठी लवकर उमेदवार द्या, तसेच राज्यसभा निवडणूकही पक्षाने लढवावीच, अशी आग्रही मागणी गुरुवारी काँग्रेस राज्य कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रभारी माणिकम टागोर यांच्याकडे करण्यात आली. तब्बल चार तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत काहीजणांनी प्रदेशाध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
तिकीट जाहीर करण्याच्या बाबतीत पक्षाकडून नेहमीच विलंब होतो व त्याचा फटका उमेदवाराला बसतो. यावेळी याची पुनरावृत्ती होऊ नये. लवकर उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी बहुतांश पदाधिकाऱ्यांनी केली. विधानसभेत काँग्रेसचे केवळ तीन आमदार असले तरी पक्षाने राज्यसभेसाठीही उमेदवार द्यावाच असा सूर व्यक्त करण्यात आला. टागोर यांनी या भावना आपण श्रेष्ठींपर्यंत पोहोचवतो, असे आश्वासन दिले.
वाढती महागाई, बेरोजगारी तसेच भ्रष्टाचार यामुळे जनता भाजप सरकारला कंटाळली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत गोव्यात दोन्ही जागांवर काँग्रेसला विजयाची संधी आहे, याकडे टागोर यांचे लक्ष वेधण्यात आले. काही पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
विरोधी, समविचारींनी एकत्र यावे: टागोर
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना टागोर म्हणाले की, पक्ष संघटना मजबूत करण्यावर प्रामुख्याने चर्चा झाली. देशभरात विरोधी समविचारी पक्ष एकत्र येत आहेत. गोव्यातही हे व्हायला हवे. विधिमंडळ पक्षनेत्याला याबाबत मी मार्गदर्शन केले आहे. मोदी, शहा यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी एकत्र यायला हवे.
टागोर म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवार द्यावा, अशी प्रत्येकाची भावना आहे. ही भावना श्रेष्ठींपर्यंत पोहोचवीन लोकसभेसाठी लवकर तिकीट देण्याचा प्रयत्न करू. उमेदवार निवडण्यासाठी पक्षाची जी प्रचलित पद्धत आहे त्यानुसारच निवड केली जाईल.
टागोर यांनी अल्पसंख्याकांवर देशभरात जे हल्ले होत आहेत त्याचा निषेध केला. मणिपूर येथे चर्च जाळल्या तसेच काल परवा आदिवासींवर हल्ले केले. या घटनांचा बैठकीत निषेध केल्याचे ते म्हणाले.
आरजी सत्तेत की विरोधात? : अमित पाटकर
प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, 'पक्ष मजबूत करण्याबाबत चर्चा विनिमयासाठी ही बैठक होती. लोकसभा निवडणुकीच्याबाबतीत कसे पुढे व एकूणच तयारी यासंबंधीही चर्चा झाली. गट स्तरावर पक्ष मजबूत केला जाईल. लोकसभा लढविण्यासाठी काहीजणांनी इच्छा व्यक्त केली आहे. परंतु लोकशाही पद्धतीनेच उमेदवारी दिली जाईल. अखिल भारतीय काँग्रेस समिती सर्वेक्षणासाठी पथक पाठवणार आहे. इच्छुक जरी जास्त असले तरी कोणालाही उमेदवारी दिली तरी एकत्रपणे काम करण्याची तयारी सर्वांनी दाखवली आहे.
विरोधी पक्षनेते युरी आलेमांव म्हणाले की, 'बैठकीत सकारात्मक चर्चा झालेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीविषयी आम्ही बोललो. प्रभारींनी केलेल्या मार्गदर्शनानुसार पक्ष मजबूत करण्यावर भर दिला जाईल. आगामी विधानसभा अधिवेशनात सरकारला जनतेच्या विविध प्रश्नांवरून आम्ही घेरणार आहोत.. फुटीर आमदारांच्या मतदारसंघांमधील प्रश्नही आम्ही प्रभावीपणे मांडणार आहोत.
सार्दिन अनुपस्थित
दरम्यान, पक्षाचे दक्षिण गोव्याचे फ्रान्सिस सार्दिन काल बैठकीला फिरकले नाहीत. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला होता. पत्रकारांकडे नंतर खुलासा करताना प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, तातडीच्या कामानिमित्त दिल्लीला जावे लागल्याने सार्दिन बैठकीला येऊ शकले नाहीत.'